Dhananjay Deshmukh : बीडमधल्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर महिन्यात अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. त्या हत्येनंतर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी न्याय मिळावा म्हणून थेट धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. वाल्मिक कराड ३१ डिसेंबरला पोलिसांना शरण आला. दरम्यान संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाने मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत काय घडलं याबाबत धनंजय देशमुख यांनी भाष्य केलं आहे.

काय म्हणाले धनंजय देशमुख?

“तपास कसा आणि काय झाला ते पूर्णपणे हाती आलेलं नाही. आम्ही जे काही रेकॉर्ड्स होते, एफआयआर, घटनाक्रम, पार्श्वभूमी हे सगळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं. कुठले गुन्हेगार किती सराईत आहेत? हे आम्ही सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टी समजून घेतल्या आणि कारवाई करण्याचा शब्द दिला. संघटीत गुन्हेगारी कशी वाढली, कसं अभय मिळालं, या सगळ्यामागे एक जाळं आहे, ते जाळं कसं विणलं गेलं? निष्पाप जीव कसे जातात? हे आम्ही सांगितलं.” असं धनंजय देशमुख यांनी सांगितलं.

वाल्मिक कराडसह सगळ्या आरोपींची पाळमुळं उखडून काढण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती

वाल्मिक कराडसह सगळ्यांची पाळमुळं उखडून काढा. घटना घडल्यानंतर, त्याआधी ज्यांनी मदत केली आहे, आरोपींना आसरा दिला, फरार केला त्या सगळ्यांना सहआरोपी करा अशी मागणी आम्ही केली आहे. असंही धनंजय देशमुख यांनी सांगितलं. धनंजय देशमुख यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

हे पण वाचा- धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजपचे सुरेश धस, चित्रा वाघ यांचा बोलविता धनी कोण ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला आहे-धनंजय देशमुख

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी नेमली आहे. एक ते दोन दिवसांत काही बदल असतील किंवा जी अडचण असेल त्या सांगा. तसंच आरोपींना काहीही झालं तरीही आम्ही सोडणार नाही असं आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं असं धनंजय देशमुख यांनी सांगितलं. आम्ही जेव्हा त्यांना सगळं सांगत होतो तेव्हा मुख्यमंत्री गांभीर्याने ऐकत होते. सगळा विचार केला तर तपास योग्य पद्धतीने होईल असा विश्वास आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येवरुन जे काही राजकारण होतं आहे त्यात मी फार काही बोलणार नाही. माझ्या भावासाठी जे न्याय मागत आहेत ते योग्यच आहे असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे. बाकी मी फार काही बोलणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला आहे की आम्ही आरोपींना कठोर शिक्षा करणार, असं संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांनी सांगितलं.