मुंबई – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी बार्टी अंतर्गत देण्यात येणाऱ्या मोफत यूपीएससी परीक्षा पूर्वतयारीच्या जागांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) मार्फत दिल्ली येथे अनुसूचित जातीतील निवडक २०० विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत विशेष प्रशिक्षण दिले जाते. ही संख्या १०० ने वाढवून ३०० करण्याचा निर्णय सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे.

दरवर्षी बार्टीमार्फत विशेष चाचणी परिक्षा घेऊन यूपीएससी परीक्षेची पूर्वतयारी करणाऱ्या २०० विद्यार्थ्यांना दिल्ली येथे मोफत प्रशिक्षणासाठी निवडले जाते. दिल्ली येथे नामांकित प्रशिक्षण केंद्रात प्रवेश आणि उमेदवारांना निवास व भोजन व्यवस्था देखील बार्टी मार्फत पुरवली जाते. २०० विद्यार्थ्यांसाठी ९ कोटी रुपये खर्च येत होता. आता १०० विद्यार्थी वाढल्याने तो १० कोटींपेक्षा जास्त होणार आहे.

मागील दोन वर्षात लॉकडाऊन काळात देखील उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आले. ऑनलाइन प्रशिक्षण पद्धतीला आत्मसात करत बार्टी मार्फत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादित केले. बार्टीचे २०२० मध्ये ९ विद्यार्थी, तर २०२१ मध्ये ७ उमेदवार यूपीएससी उत्तीर्ण होऊन अधिकारी बनले आहेत. याचाच विचार करून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशिक्षणासाठी निवड होणाऱ्या विद्यार्थी संख्येत १०० ने वाढ केली. त्यामुळे यावर्षी ३०० विद्यार्थी यूपीएससी परीक्षेचे प्रशिक्षण घेणार आहेत.

हेही वाचा : “मी एक सीडी लावली तर सगळा महाराष्ट्र हादरेल”; करुणा शर्माचे खळबळजनक वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीतील इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी बार्टीच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी असे आवाहन महासंचालक गजभिये यांनी केले आहे.