मुंबई : मंत्रीपद जाऊन पाच महिने उलटले तरीही धनंजय मुंडे यांनी ‘सातपुडा’ हे शासकीय निवासस्थान रिकामे केलेले नाही. मुंबईत आपले कुठेही घर नसल्याने बंगला सोडला नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते. असे असताना गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी अर्जासह दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी मुंबईत गिरगाव चौपाटीवर असलेल्या सदनिकेचा उल्लेख केलेला आहे. हे घर सध्या वापरात नाही.
गिरगाव चौपाटीजवळ एन.एस. पाटकर मार्गावर ‘वीरभवन’ या २२ मजली इमारतीत नवव्या मजल्यावर ९०२ क्रमांकाची सदनिका असल्याचे मुंडे यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात जाहीर केले आहे. डिसेंबर २०२३ मध्ये मुंडे आणि त्यांच्या पत्नी राजश्री यांच्या संयुक्त नावे १६ कोटी ५० लाख रुपयांना ही सदनिका खरेदी केली होती. प्रतिज्ञापत्रात धनंजय मुंडे यांनी स्वत: १० कोटी रुपये खर्च केल्याचा उल्लेख आहे. या घरात सध्या कोणीही राहात नसून खरेदी केल्यापासूनच ते बंद आहे.
सदर प्रतिनिधीने इमारतीत भेट दिली असता, सदनिकेत काही कामे सुरू असल्याचे सांगण्यात आले. ही सदनिका २१५१ चौ. फुटांची असून त्यामध्ये चार शयनकक्ष आहेत. मुदतीपेक्षा जास्त काळ बंगला वापरल्याबद्दल ४२ लाख रुपयांचा दंड त्यांना झाला आहे. पण दंडाची रक्कम माफ करण्याचे मुख्यमंत्र्यांना अधिकार असतात. मुंडे यांनी बंगलाही सोडलेला नाही वा काही रक्कमही भरलेली नाही, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्राकडून सांगण्यात आले.
मुंडे यांचे मौन
आपले मुंबईत अन्यत्र घर नसल्याने तसेच सध्या उपचार सुरू असल्याने सरकारी निवासस्थान सोडलेले नाही, असा दावा मुंडे यांनी केला होता. मुंबईत सदनिका असल्याची माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात देण्यात आल्याबाबत मुंडे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दोन दिवस काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यांच्या सचिवाने यावर आम्हाला काही भाष्य करायचे नाही, असे स्पष्ट केले.