अध्यात्माबरोबर राजकारणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या श्रीक्षेत्र भगवानगड, नारायणगड आणि गहिनीनाथ गडाचे दर्शन घेऊनच सोमवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडेही आपल्या नव्या राजकीय पर्वाची सुरुवात करणार आहेत. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी भगवानगडावरूनच राज्यभरातला समाज जोडून राजकीय निर्णय जाहीर केले होते. त्यांच्यानंतर पंकजा मुंडे यांनीही आपल्या राजकीय पर्वाची सुरुवात गडावरूनच केली.
 बीड जिल्ह्यासह राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत भगवानबाबा यांच्या श्रीक्षेत्र भगवानगडाला दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी राजाश्रय दिल्यानंतर राजकारणातही गडाचे महत्त्व वाढले. दसऱ्याच्या दिवशी होणाऱ्या मेळाव्यातून गोपीनाथ मुंडे राजकीय दिशा जाहीर करत होते. मुंडे यांच्या अकाली निधनानंतर त्यांची वारस ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनीही भगवानगडावरूनच राजकीय पर्वाला सुरुवात केली. तीन वर्षांपूर्वी मुंडे कुटुंबातील गृहकलहानंतर राष्ट्रवादीत गेलेल्या धनंजय मुंडे यांची नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनात विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. या पाश्र्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी आपल्या नव्या राजकीय पर्वाची सुरुवात गडांचे दर्शन घेऊनच करण्याचा निर्णय केला आहे. निवड झाल्यानंतर परळीत येऊन गोपीनाथगडावर जाऊन दर्शन घेतल्यानंतर धनंजय मुंबईला गेले. सोमवारी (५ जानेवारी) सकाळी श्रीक्षेत्र भगवानगड येथे संत भगवानबाबा यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन गहिनीनाथ गड, त्यानंतर नारायणगड येथे दर्शन घेऊन ते गेवराई येथे राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित यांनी आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांना गडांवरून कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वाचे लक्ष आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhananjay munde political career start on three fort
First published on: 05-01-2015 at 01:10 IST