काँग्रेसची उमेदवारी मिळवून देण्यात कारणीभूत ठरल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी मुंबईत भेट घेऊन आभार मानले. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस विधिमंडळ उपनेते विजय वडेट्टीवार यांनी धानोरकरांना उमेदवारी पवार यांच्यामुळे नव्हे तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यामुळे मिळाल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे पवार-धानोरकर भेटीकडे राजकीय चष्म्यातूनही बघितले जात आहे. यामुळे काँग्रेसमध्येअस्वस्थता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघातून विशाल मुत्तेमवार, विनायक बांगडे यांच्याऐवजी धानोरकरांना उमेदवारी कशी मिळाली हे सर्वश्रूत आहे. या घडामोडीत शरद पवार यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती व धानोरकर यांनीही पवार यांच्यामुळेच उमेदवारी मिळाली असे जाहीरपणे सांगितले होते. यात विधानसभेचे माजी उपसभापती अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांचाही खारीचा वाटा होता. धानोरकरांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी वडेट्टीवार व सुभाष धोटे दिल्लीत पंधरा दिवस ठाण मांडून होते. मात्र, प्रयत्न कामी येत नाही  हे लक्षात येताच दोघेही माघारी आले होते. शेवटी शरद पवार यांच्या शब्दाने काम केले. वडेट्टीवार यांनी ६ जून रोजी धानोरकर यांच्या सत्कार कार्यक्रमात उमेदवारी शरद पवार यांच्यामुळे नाही तर अशोक चव्हाण यांच्यामुळे मिळाल्याचे सांगितले होते. त्यानंतर धानोरकर यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेऊन आभार मानले. विशेष म्हणजे, प्रदेश काँग्रेसच्या मुंबईतील बैठकीतही धानोरकर यांनी पवार यांचे आभार मानले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhanorkar giving thanks to pawar
First published on: 10-06-2019 at 02:01 IST