सातारा : धोम धरणातील मंजूर व हक्काचे पाणी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना वेळच्या वेळी आणि पूर्ण क्षमतेने मिळावे, पाण्याचे बेकायदा इतरत्र वाटप होऊ नये यावर लक्ष ठेवणे, पाणी वापराबाबत शेतकऱ्यांत जनजागृती करण्यासाठी एक तपापासून कार्यरत धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने आज १४ वी धोम धरण परिक्रमा आणि जलपूजनाचा कार्यक्रम उत्सवात पार पडला. यात वाई, जावळी, सातारा व कोरेगाव या तालुक्यांतील दोनशेहून शेतकरी सहभागी झाले होते.

यानंतर झालेल्या सभेत धोम धरण पाणी बचाव समितीचे अध्यक्ष सी. आर. बर्गे यांनी येत्या दोन वर्षांत धोम धरणाच्या डाव्या कालव्याचे संपूर्ण अस्तरीकरण करून घेण्याचे काम समिती शासनाकडे पाठपुरावा करून निश्चित पूर्णत्वास नेईल. तसेच कालव्याच्या वरील भागातील शेतकऱ्यांनी कालव्याच्या टेलचे भिजवण पूर्ण करून घेण्यासाठी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

शाश्वत पाण्यासाठी कालवा पाणीवाटप सहकारी संस्था स्थापन करून त्या चालवणे काळाची गरज असल्याचे सांगून समितीचे सचिव नंदकुमार पाटील म्हणाले, ‘वैयक्तिक पाणीवाटप खरे तर बंद झाले आहे. पण संस्था नसल्याने हे पाणीवाटप सुरू आहे. संस्था स्थापन केल्यास तुम्ही तुमच्या पाण्याचा दरही स्वतः ठरवू शकता. तेव्हा गावोगावी पाणीवाटप संस्था स्थापन करा. त्यासाठी समिती लागेल ते सहकार्य करेल. या कामी राजकारण बाजूला ठेवून शेतकरी म्हणून एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले.

समितीचे कार्याध्यक्ष रणजित फाळके यांनी मागील वर्षात धोम धरणाच्या पाणी वाटपासंबंधी कराव्या लागलेल्या आंदोलनांचे यशापयश विशद केले. याचे महत्त्वपूर्ण फलित म्हणजे धोम धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यांची सफाई १३ यंत्रांद्वारे सुरू झाली आहे. अशी कालवा सफाई धोम धरण कार्यान्वित झाल्यापासून झालेली नव्हती. आगामी काळात आपण डाव्या व उजव्या कालव्याचे संपूर्ण अस्तरीकरण करून घेण्यासाठी प्रयत्नशील असून, त्यात यश टप्प्यात आलेले आहे. समस्त शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या पाण्याच्या लढ्यात जेव्हा हाक दिली जाईल तेव्हा हाकेला ओ देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

या वेळी शेतकरी कोरेगाव पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ जगदाळे, सुरेश जगदाळे, कॅप्टन महादेव भोसले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोरेगाव तालुकाध्यक्ष जीवन शिर्के, विनायक साळुंखे, संजय शेलार, धीरज माने यांनी समितीच्या कार्याचे कौतुक करून सर्वांनी राजकारण व गट-तट बाजूला ठेवून शेतकरी म्हणून एकत्र येऊन हक्काचे पाणी मिळवू या आणि वाढवू या असे आवाहन केले. शेवटी सर्व शेतकऱ्यांनी धोम धरणाच्या काठी उतरून श्रीफळ पाण्यात सोडून जलपूजन केले.

कुमठे ग्रामस्थांतर्फे सत्कार

धोम धरण पाणी बचाव समिती समस्त शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी सातत्याने लढा देत असल्याबद्दल कुमठे(ता. कोरेगाव) ग्रामस्थांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांचा पोलीस पाटील जयवंत जगदाळे यांच्या हस्ते सत्कार केला.