धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे बेदम मारहाणीत झालेल्या पाच जणांच्या मृत्यूप्रकरणी २३ जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी काही आरोपी राईनपाडा गावचे रहिवासी आहेत. विशेष म्हणजे यातील बहुतांश आरोपी २० ते ३० वयोगटातील आहेत. याप्रकरणी आणखीही काही लोकांचा पोलीस शोध घेत आहेत. या लोकांना शोधण्यासाठी पोलिसांची ५ पथके तयार करण्यात आली आहेत. मुळे पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून रविवारी ही घटना घडली होती. सोशल मीडियातून व्हायरल होत असलेल्या अफवेमुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

रविवारी राईनपाडा येथे आठवडी बाजार भरला होता. या बाजाराच्या परिसरातच ही घटना घडली असून मृत लोक बाजाराच्या ठिकाणी एसटीतून उतरले होते. दरम्यान, त्यातील एक जण एका लहान मुलीशी बोलण्याचा प्रयत्न करीत होता. यामुळे गावातल्या काही लोकांचा ते लहान मुले पळवणारे असल्याचा समज झाला. त्यानंतर ही अफवा बाजारपरिसरात पसरल्याने तेथे मोठ्या प्रमाणावर जमाव गोळा झाला. यांपैकी सुमारे ३५ जणांनी या पाच जणांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यामधील १२ जण राईनपाडा गावाचे रहिवाशी होते. यामध्ये काही किशोरवयीन मुलांचाही समावेश होता, अशी माहिती धुळ्याचे पोलीस अधीक्षक एम. रामकुमार यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली.

दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींवर हत्या (कलम ३०२) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून जमाव करुन दंगल माजवल्याचे कलमही त्यांच्यावर लावण्यात आले आहे. या सर्वांना रविवारी रात्रीच ताब्यात घेण्यात आले आहे.

या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियातून तत्काळ व्हायरल झाला होता. त्यामुळे ही घटना समोर आली. सुरुवातीला लोक त्यांना चपलांनी मारत होते. त्यानंतर काही तरुणांनी त्यांना राईनपाडा गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात डांबले आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली. या व्हिडीओत काही अल्पवयीन मुलेही त्यांना लाथाबुक्यांनी मारताना आणि शर्टची कॉलर ओढताना दिसत आहेत. यांपैकी मारहाण होत असलेला एक जण हात जोडून आपल्याला न मारण्याचे आवाहन करीत होता. तर इतर चार जणांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात जमीनीवर पडलेले या व्हिडीओत दिसत आहेत. या घटनेचे चित्रीकरण करणारी व्यक्तीही त्यातील एकाला ‘मी तुला पुन्हा मारेन’ अशा प्रकारचे वक्तव्य करताना दिसत आहे.