देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केलेलं भाषण चांगलंच चर्चेत आहे. या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना खडे बोल सुनावले आहेत. तसंच फोडाफोडीचे आरोप करणाऱ्यांनाही देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे. एवढंच नाही तर आपल्या बरोबर जे सहकारी आले आहेत त्यांच्यासाठीही आपण निवडणुकीत झटलं पाहिजे असंही देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. एवढंच नाही तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे काय काल राजकारणात आले का? असाही सवाल त्यांनी आपल्या भाषणात केला. फोडाफोडीचे आरोप करणाऱ्यांना त्यांनी उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“लोक म्हणतात तुम्ही दोन पक्ष फोडले, कुणी म्हणतं तुम्ही घर फोडलं. मला विचारायचं आहे की जनादेशाची हत्या करण्याचं काम कुणी केलं. पक्ष फोडले म्हणणाऱ्यांना एकच सवाल आहे की एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे काय काल राजकाणात आले आहेत का? मी मोहिनी घातली आणि ते माझ्या मागे आले. असं घडलेलं नाही. ज्या ज्या वेळी अन्याय होईल त्या-त्या वेळी एकनाथ शिंदे जन्माला येतील. आणखी एक स्पष्टपणे सांगतो माझ्या मनात संभ्रम नाही. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात जी युती झाली ती आमची भावनिक युती झाली. वादळं आली असतील, व्यक्ती व्यक्तींचं काही झालं असेल पण भावनिक युती आहे. राष्ट्रवादीशी युती आहे ती राजकीय मैत्री आहे. कदाचित ती पण भावनिक मैत्री येत्या काळात होईल. पण आज हे आमच्या मनात हे स्पष्ट आहे.

हे पण वाचा- “२०१९ चा महागद्दार, राजकारणातला करंटा आणि महाकलंक व्यक्ती म्हणजे…”, बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल!

तुष्टीकरण करणाऱ्या पक्षांना बरोबर घेणार नाही

आज आपण देशात सगळे पक्ष एकत्र येऊन मोदीजी नको अशी भावना सातत्याने मांडत आहेत. काय केलंय मोदींनी? देशाला अकराव्या क्रमांकावरुन पाचव्य क्रमाकांच्या अर्थव्यवस्थेवर आणलं. भारताने गरिबी कमी कऱण्याचं काम दहा वर्षात जे केलंय ते अविश्वसनीय आहे हे इंटरनॅशनल मॉनिटरिंग समिती सांगते. जगात भारताचा डंका वाजतो आहे. जगात सर्वाद जास्त रोजगाराच्या संधी भारतात तयार होणार आहे. आज ज्यावेळी सगळे लोक मोदींच्या विरोधात एकत्र येत आहेत तेव्हा हे म्हणून चालणार नाही की आम्ही कुणाला बरोबर घेणार नाही. जे येतील त्यांना बरोबर घेऊ पण एक गोष्ट नक्की आहे की काँग्रेसचा विचार चालणार नाही. काँग्रेसचा विचार तुष्टीकरणाचा विचार आहे. तुष्टीकरणाचा विचार करणारे पक्ष आम्ही बरोबर घेणार नाही. एमआयएम, मुस्लीम लिग यांनाही आम्ही बरोबर घेणार नाही. फाळणी कुणामुळे झाली? अशा प्रकारचा विचार करणाऱ्यांमुळे झाली. देशाचं विभाजन झालं तरी तुष्टीकरणाची नीती संपलेली नाही. त्यामुळे असं कुणालाही बरोबर घेणार नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं. जे कुणी येतील त्यांचं स्वागत करु पण पक्षाची जी तयारी आहे ती वाया जाऊ देणार नाही.

हे पण वाचा- “राष्ट्रवादीला बरोबर घेणार नाही म्हणणाऱ्या भाजपासाठी सत्ता हा सट्टा…”, संजय राऊतांचं फडणवीसांना उत्तर

मी उदाहरणं देतो आहे.. कुणालाही नावं ठेवत नाही

प्रताप गडावर ज्यावेळी छत्रपती शिवरायांना अफझल खानाचा कोथळा काढायचा होता. अफझल खानाला भेटायचा निर्णय शिवरायांनी घेतला तेव्हा अनेक जण म्हणाले की महाराज मंदिरं तोडणाऱ्या माणसाला तुम्ही भेटायला जाता? पण छत्रपतींच्या डोक्यात पक्कं होतं की काय करायचं आहे. त्यांनी अफझल खानाला संपवलं आणि स्वराज्य स्थापन केला. त्यावेळी मावळ्यांच्या मनात शंका नव्हती की महाराज अफझल खानाला भेटायला का जात आहेत कारण त्यांचा नेतृत्वावर विश्वास होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मी जी उदाहरणं देतो आहे त्यात हे सांगू इच्छितो की मी कुणालाही अफझल खान म्हटलेलं नाही. आम्ही सगळे छत्रपतींचे मावळे आहोत. इतिहासाचे संदर्भ, त्यातले मतितार्थ लक्षात घ्यायचा असतो. परिस्थिती अनुरुप निर्णय घेऊन काम करावं लागतं. कार्यकर्ते, सैनिक, मावळे यांच्या मनात नेतृत्वाबाबत विश्वास असतो तेव्हा अशा प्रकारचं धोरण यशस्वी होतं असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.