Uddhav Thackeray And Raj Thackeray Alliance Updates: राज्यात प्राथमिक शिक्षणात पहिल्यापासून हिंदीसक्तीच्या विरोधात एकत्र आल्यापासून शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात झालेल्या भेटीगाठींमुळे दोन्ही पक्ष युतीच्या दृष्टीने वाटचाल करत असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, शिवसेना (उद्धव ठाकरे) राज्यात महाविकास आघाडीचा आणि राष्ट्रीय स्तरावर इंडिया आघाडीचा भाग आहे. राज ठाकरे यांच्या परप्रांतीयविरोधी भूमिकेमुळे काँग्रेसमधील काही नेत्यांचा त्यांना विरोध आहे. अशात उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा नुकताच पार पडला. या दौऱ्यात ठाकरे यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती.
आज माध्यमांनी शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते संजय राऊत यांना, “शिवसेना आणि मनसे युतीची राहुल गांधींना कल्पना देण्यात आली आहे का?” असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती इंडिया आघाडीचा विषय नाही. हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर राष्ट्रीय स्तरावर चर्चा होत नाही. काही लोकांचे पक्षप्रमुख दिल्लीत असल्याने ते दिल्लीला जाऊन त्यांच्याशी चर्चा करत असतील. पण या दोन बंधूंचा एकत्र येण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. राजकीय दृष्ट्या ही महाराष्ट्रातील एक मोठी घडामोड आहे. त्यामुळे यावर चर्चा होतच असते.”
ते पुढे म्हणाले, “इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये या विषयावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष चर्चा होत असते. त्यामुळे दोन बंधूंनी एकत्र येण्यामध्ये इंडिया आघाडीत कोणालाही आक्षेप नाही. मला तिथे असे चित्र दिसले की, याबाबत कोणालाही आक्षेप नाही. मराठीच्या प्रश्नावर हर्षवर्धन सपकाळ, म्हणजेच इथल्या काँग्रेसची मराठीच्या प्रश्नावर हीच भूमिका आहे.”
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना ७ ऑगस्ट रोजी रात्री जेवणासाठी आमंत्रित केलं होतं. यावेळी देशातील विविध विषयांसंदर्भात इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. मात्र, या बैठकीवेळी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे शेवटच्या रांगेत बसल्याचा दावा करत शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.