राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पॅलेस्टाईनची बाजू घ्यायला हवी होती असे उद्गार काढले. तसंच त्यासाठी त्यांनी पंडित नेहरु आणि इंदिरा गांधी यांच्यासह अटलबिहारी वाजपेयी यांचीही उदाहरणं दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलची बाजू घ्यायला नको होती असंही ते म्हणाले. ज्यानंतर आता भाजपाकडून त्यांच्यावर सातत्याने टीका केली जाते आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा नेते विनोद तावडे यांच्यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही या मुद्द्यावरुन शरद पवारांवर टीका केली आहे.
काय म्हटलं आहे नारायण राणेंनी?
शरद पवार यांनी इस्रायल आणि हमासच्या युद्धावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेली टीका दुर्दैवी आहे. दहशतवाद हा कुणा एका व्यक्तीच्या विरोधात किंवा देशाविरोधातला नसतो. दहशतवाद हा माणुसकीच्या विरोधातला असतो ही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुनही मांडली आहे. या धोरणाप्रमाणे त्यांनी दहशतवादी हल्ल्याविरोधी भूमिका त्यांनी घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका ही पॅलेस्टाईनच्या विरोधात नाही तर दहशतवादाच्या विरोधात आहे. दहशतवाद विरोधी भूमिका घेणं हे चुकीचं आहे असं शरद पवारांना म्हणायचं आहे का? असा प्रश्न नारायण राणेंनी आजच्या पत्रकार परिषदेत विचारला.
पॅलेस्टिनी आणि दहशतवादी एकच आहेत असं शरद पवारांना म्हणायचं आहे का?
“पॅलेस्टिनी आणि दहशतवादी एकच आहेत असं शरद पवारांना म्हणायचं आहे का? शरद पवार यांनी आपल्या राज्यात आणि देशात आत्तापर्यंत बरीच मंत्रिपदं भुषवली. मुख्यतः ते केंद्रात संरक्षण मंत्रीही झाले होते. तसंच केंद्रातलं कृषी मंत्रीपदही त्यांनी सांभाळलं आहे. तर महाराष्ट्रात चारवेळा त्यांनी मुख्यमंत्रीपद भुषवलं आहे. मला त्यांना आठवण करुन द्यायची आहे, १२ मार्च १९९३ ला मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले. त्यात २५७ जणांचा मृत्यू झाला आणि १४०० लोक जखमी झाले. त्यावेळी शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी त्यावेळी १३ वा बॉम्बस्फोट मशिदीत झाल्याची खोटी माहिती देऊन दहशतवाद्यांना वाचवण्याचा किंवा पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला नव्हता का? तुष्टीकरणाच्या धोरणामुळे देशावर आजवर अनेक संकटं आली. आता तरी शरद पवार हे तुष्टीकरण सोडून देश प्रथम ही भूमिका घेतील का? असा माझा त्यांना प्रश्न आहे.” असा प्रश्न नारायण राणेंनी विचारला आहे.
शरद पवार काय म्हणाले होते?
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात हे वक्तव्य केलं होतं की ज्या भागात युद्ध सुरु आहे ती जमीन पॅलेस्टिनी लोकांची आहे. तिथे अतिक्रमण झालं आणि इस्रायल हा देश उदयाला आला. मला त्याच्या खोलात जायचं नाही. मात्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यापासून ते वाजपेयींपर्यंत सर्वांनी पॅलेस्टाईनला मदत करण्याची भूमिका घेतली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्दैवाने इस्रायलची बाजू घेतली आहे. जमिनीचे मूळ मालक असलेल्या पॅलेस्टाईनकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आहे असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं. त्यांच्या या टीकेचा समाचा आता भाजपाकडून घेतला जातो आहे.