सोयाबीन संकटात 

या जिल्ह्यात सरासरीच्या ९४ टक्के पाऊस झाला असला, तरी महिनाभरापासून पावसाने दिलेला खंड हा सोयाबीनसह अन्य पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम करणारा ठरू शकेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यंदाच्या खरीप हंगामात जून आणि जुलैमध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे पिकांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार झाले, पण पावसाने नंतर दडी मारल्याने बहुतांश कोरडवाहू शेतीक्षेत्र असलेल्या जिल्ह्यातील सोयाबीन पीक गडद संकटात सापडले आहे.

जिल्ह्यात २ लाख ९१ हजार हेक्टरवर म्हणजे सरासरी लागवडीखालील क्षेत्राच्या ९० टक्के पेरा झाला आहे. गेल्या वर्षीपेक्षा सोयाबीनचे क्षेत्र कमी झाले आहे. वाढता उत्पादन खर्च, भावातील चढउतारामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनपेक्षा कपाशी आणि तूर पिकाकडे अधिक कल दर्शवला आहे. जिल्ह्यात १ लाख ८१ हजार हेक्टरवर कपाशी, १ लाख ३४ हजार हेक्टरवर तूर, ३१ हजार हेक्टरवर मूग, २७ हजार हेक्टरवर उडीद व २८ हजार हेक्टरमध्ये ज्वारी पिकाची लागवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षी कापूस आणि तुरीला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी या दोन पिकांना अधिक पसंती दिली, तरीही सर्वाधिक क्षेत्र  सोयाबीनचेच आहे. कमी मशागतीत हमखास उत्पादन देणारे पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. यंदा सुरुवातीला समाधानकारक पावसामुळे सोयाबीनचे चांगले उत्पादन होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, पण महिनाभरापासून पाऊसच नाही. मध्यंतरी झालेल्या तुरळक स्वरूपाच्या पावसाने भरपाई करून दिलेली नाही. कागदावर अमरावती जिल्ह्यातील पावसाची आकडेवारी समाधानकारक म्हणजे, ९४ टक्के असली, तरी पावसाने दिलेला खंड निराश करणारा ठरला आहे. सोयाबीनच्या शेंगा परिपक्व होऊ शकणार नाहीत, त्यामुळे उत्पादनात मोठी घट येईल, असे नांदगाव येथील शेतकरी ओंकार गुडधे यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात सूर्यफूल, तीळ, भुईमूग या तेलबियांचा पेरा खूपच कमी झाला आहे. जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात केवळ ४ हजार हेक्टरवर तीळ पिकाची लागवड करण्यात आली आहे.

सरकारने आयात धोरण बदलावे -विनोद कलंत्री

सरकारने शेतमालाच्या खरेदीच्या धोरणात स्पष्टता न ठेवल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. यावेळी पिकस्थिती समाधानकारक आहे, पण सोयाबीन संकटात आहे. सोयाबीनच्या अर्थकारणावर गेल्या काही वर्षांत काळी छाया आली आहे. कृषीमालाला चांगला भाव मिळाला, तर ग्राहकांपर्यंत किफायतशीर भावात अन्नधान्य पोहोचू शकत नाही आणि ग्राहकांच्या लाभाचा विचार केला, तर शेतकऱ्यांना चांगला दर मिळू शकत नाही, अशी विचित्र स्थिती आहे. गेल्या वर्षी तूर आणि मुगाला चांगला भाव मिळाला. शेतकरी कधी नव्हे, इतके समाधानी दिसले, पण सरकारने आयातीचा निर्णय घेतल्यावर भाव पडले. इतर देशांमधून शेतमाल आयात करण्याआधी देशांतर्गत शेतकऱ्यांच्या स्थितीचा विचार सरकारने केला पाहिजे, असे मत अमरावती चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रिजचे अध्यक्ष विनोद कलंत्री यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले, शेतमालाच्या खरेदीत व्यापारी आता उरलेलेच नाहीत. त्यांची जागा प्रक्रिया करणाऱ्या कारखानदारांनी घेतली आहे. सरकारने आता सर्वसमावेशक असे धोरण आखले पाहिजे.