नांदेड : कापसाला भाव मिळू दे, सोयाबीन, उसाला भाव मिळू दे… कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळू दे… त्यांचा पगार दुप्पट होऊ दे… त्यांना आठवा, नववा, दहावा वेतन आयोग मिळू दे…. असे ‘मालवणी गाऱ्हाणे’ (खास प्रार्थना) लोकप्रिय कोकणी अभिनेते दिगंबर नाईक यांनी बुधवारी महसूल सप्ताहात शंकरराव चव्हाण सभागृहात मांडले. त्याला उपस्थित प्रेक्षकांनी ‘होय म्हाराजा’ म्हणत जोरदार साथ दिली !

दि. १ ऑगस्टपासून महसूल सप्ताह नांदेडमध्ये उत्साहात साजरा केला जातो आहे. बुधवारी या सप्ताहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी लोकप्रिय कोकणी अभिनेते दिगंबर नाईक यांना पाचारण करण्यात आले होते. त्यांनी आपल्या खास शैलीत शंकरराव चव्हाण सभागृहात अक्षरशः धमाल उडवून दिली. दुपारी २ ते ५ या वेळेत झालेल्या या कार्यक्रमात सेवानिवृत्त महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रमाणेच महसूल कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.

दिगंबर नाईक मंचावर येताच प्रेक्षकांनी त्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात करताना प्रेक्षकातून कापसाला भाव मिळू दे… अशा घोषणा देण्यात आल्या. त्याचा संदर्भ घेत नाईक यांनी आपल्या खास शैलीत कोकणी गाऱ्हाणे मांडले. गणेशोत्सव जवळ आला आहे. दि. २७ रोजी गणरायांचे आगमन होत आहे. या पार्श्र्वभूमीवरच गाऱ्हाणे मांडण्यात आले. दिगंबर नाईक यांचे कोकणी गाऱ्हाणे म्हणजे कोकणी माणसाने देवाला घातलेली एक खास प्रार्थना.

गाऱ्हाणे म्हणण्याची एक विशिष्ट पद्धत असते. ज्यामध्ये काही विशिष्ट शब्द आणि वाक्यरचना वापरली जाते. चांगल्या आरोग्यासाठी, समद्धीसाठी किंवा कुठल्यातरी कार्यासाठी यश मिळावे यासाठी याचे प्रयोजन असते. मराठवाड्यात सध्या खरिपाचा हंगाम सुरु आहे. कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे कापूस वेचणला येईल तेव्हा त्याला चांगला भाव मिळू दे, असे गाऱ्हाणे मांडावे असा प्रेक्षकांचा आग्रह होता, तो पूर्ण करीत कापसासह सोयाबीन आणि ऊसाला सुद्धा भाव मिळू दे. महसूल कर्मचाऱ्यांचे चांगभले होऊ दे, असेही गाऱ्हाणे दिगंबर नाईक यांनी गणरायापुढे मांडले.

होय म्हाराजा…

लाडक्या बहिणीला खुश करत भाजप युती सत्तेत विराजमान आहे. आता शेतकरी बांधवांसह महसूलमधील भावंडांना खुश केले पाहिजे, असा उपस्थितांचा आग्रह होता. तो लक्षात घेऊन दिगंबर नाईक यांनी गणरायापुढे गाऱ्हाणे मांडले आणि प्रेक्षकांनी ‘होय म्हाराजा’ म्हणत आपली संमती व्यक्त केली. नाईक यांनी सुसंगती सदा घडो या सुभाषिताचा संदर्भ देत महसूल कर्मचाऱ्यांना चांगले अधिकारी लाभावेत, त्यांची सुसंगती घडावी, अशी सुद्धा प्रार्थना केली.