पुणे वाचन मंदिर संस्थेसमवेत करार
नगर : द्विशतकाकडे वाटचाल करणाऱ्या अहमदनगर जिल्हा वाचनालयातील सुमारे १५० वर्षांपेक्षा जास्त जुन्या मौल्यवान परंतु कालानुरूप जीर्ण झालेल्या ग्रंथांचे ‘डिजिटायझेशन’ केले जाणार आहे. नगर जिल्हा वाचनालयाने पुणे वाचन मंदिर संस्थेबरोबर करार केला आहे. डिजिटायझेशनह्णमुळे रसिक वाचक व अभ्यासकांना दुर्मीळ ग्रंथ व पुस्तके पुन्हा उपलब्ध होणार आहेत. जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक यांनी ही माहिती दिली. अहमदनगर जिल्हा वाचनालय व पुणे नगर वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा वाचनालयातील असंख्य दुर्मीळ पुस्तकांचे डिजिटायझेशन करून त्यांचे जतन व सर्वाना ते संकेतस्थळावर पाहता येण्याविषयीचा करार नुकताच झाला.
या वेळी नगरचे पदाधिकारी शिरीष मोडक, विक्रम राठोड, अनंत देसाई, पुणे नगर वाचन मंदिरचे संचालक अरिवद रानडे, प्रकल्प समन्वयक तुषार बारी, ग्रंथपाल सविता गोकुळे, किरण आगरवाल, प्रा. मेघा काळे, प्रा.ज्योती कुलकर्णी, शिल्पा रसाळ, राहुल तांबोळी, गणेश अष्टेकर, कवी चंद्रकांत पालवे, ग्रंथपाल अमोल इथापे, नितीन भारताल उपस्थित होते. विक्रम राठोड म्हणाले,की वाचन संस्कृतीचा दुर्मीळ ठेवा अभ्यासक व वाचकांना जगभरात उपलब्ध होणे ही लोकाभिमुख घटना असून, दुर्मीळ ग्रंथ पुढील पिढय़ांपर्यंत जाणार आहेत. प्रकल्प समन्वयक अरिवद रानडे यांनी सांगितले,की जिल्हा वाचनालयातील दुर्मीळ ग्रंथांचा अमूल्य ठेवा डिजिटायझेशनच्या माध्यमातून जगभरातील वाचकांना उपलब्ध होणे हे क्रांतिकारी पाऊल असल्याचे सांगून जिल्हा वाचनालयाने यासाठी घेतलेला पुढाकार वाचन संस्कृती जतन व संवर्धन करण्यास प्रेरक आहे. या माध्यमातून प्रारंभी १०० पुस्तके पुणे नगर वाचन मंदिरास सुपूर्द करून ते डिजिटायजेशन करून पुन्हा जिल्हा वाचनालयास परत करण्यात येतील व नंतर हा ठेवा सर्वासाठी संकेतस्थळाच्या माध्यमातून खुला होईल. सूत्रसंचालन शिल्पा रसाळ यांनी केले.