गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पोलीस दलाला मोठं यश मिळालं. पोलिसांनी २६ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. मात्र, त्यात काही जवानही जखमी झाले. यानंतर त्यांना नागपूरला उपचारासाठी हलवण्यात आलं. यावरच पत्रकारांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना मागील अनेक वर्षांपासून गडचिरोलीतच चांगल्या उपचाराच्या सुविधा का नाही? असा प्रश्न विचारला. यावर दिलीप वळसे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

दिलीप वळसे म्हणाले, “गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीच्या विकासाबाबत एक आराखडा तयार केलाय. याशिवाय गडचिरोलीत आवश्यक रस्ते आहेत, पिण्याचं पाणी आहे, वीज व्यवस्था आहे. शिक्षणाची व्यवस्था आहे आणि आरोग्यासाठी देखील पोलिसांचं एक रुग्णालय गडचिरोलीत आहे. मात्र, त्यात सुधारणा करण्यावर किंवा विशेष रुग्णालय उभारण्याला आमचं प्राधान्य असेल.”

दिलीप वळसे यांनी यावेळी नक्षलवाद्यांविरोधात लढणाऱ्या जवानांना पुरस्कार देखील देण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून यापेक्षा अधिकचा निर्णय घेण्यात येईल, असंही त्यांनी नमूद केलं.

ही चकमक महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर झाली. त्यामुळे ओळख न पटलेले नक्षलवादी महाराष्ट्रातील आहे की छत्तीसगडचे याविषयी तपास सुरू आहे, अशीही माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

हेही वाचा : “मिलिंद तेलतुंबडे कायम ३ स्तरीय सुरक्षेत फिरायचा, असं असतानाही…”, नक्षलवाद्यांवरील कारवाईवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

गडचिरोलीत नेमकी काय कारवाई झाली?

गडचिरोली पोलीस आणि सी-६० जवानांची टीमने मिळून १४ नोव्हेंबरला २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीनंतर अनेक नक्षलवादी जंगलात फरार झाले. यानंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवली. यात अनेक नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. यातील १५-१६ जणांची ओळख पटली आहे, तर उर्वरीत १० जणांची ओळख पटणे बाकी आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक समीर शेख व सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. यात ४ जवान जखमी झाले. त्यांना तात्काळ नागपूरला हलवण्यात आलं असून उपचार सुरू आहेत. गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरला जाऊन या जवानांची भेट घेतली आहे.