संयुक्त जनता दलचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. नितीश कुमार यांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात इंडिया आघाडीची मोट बांधली होती. त्यांच्या नेतृत्त्वातच पहिली बैठक पाटण्यात पार पडली. परंतु, आता त्यांनीच इंडिया आघाडीत खडा टाकला आहे. इंडिया आघाडीतून बाहेर पडून त्यांनी मुख्यमंत्री पदाचाही राजीनामा दिला. तर, आता ते लवकरच भाजपाबरोबर सत्ता स्थापन करणार आहेत. नितीश कुमारांच्या या राजकीय खेळीमुळे इंडिया आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. यावरून भाजपाने इंडिया आघाडीवर आता टीका करायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही इंडिया आघाडीवर टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नितीश कुमार आता भारतीय जनता पार्टीबरोबर मिळून बिहारमध्ये सरकार स्थापन करणार आहेत. आज (२८ जानेवारी) सायंकाळी ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, तर भाजपा नेते सुशीलकुमार मोदी यांची उपमुख्यमंत्री नेमणूक केली जाऊ शकते. राज्यपालांकडे सुपूर्द केलेल्या राजीनाम्यात नितीश कुमार यांनी लिहिलं आहे की, आम्ही महागठबंधनशी नातं तोडलं आहे.

हेही वाचा >> राजीनामा देण्याची वेळ का आली? नितीश कुमारांनी मांडली व्यथा; म्हणाले…

याबाबत केशव उपाध्ये यांनी एक्सवर पोस्टमध्ये म्हटलं, “फुटलेल्या INDI आघाडीचे तुकडे तर झाले आहेत… बंगालमध्ये ममता बॅनर्जी वेगळ्या लढणार आहेत, तर पंजाबमध्ये आप… पंगतीत सोबत जेवणारे, जागा वाटपाच्या आणि मोदीजींना हरवण्याच्या गप्पा मारणारे, आज एकमेकांच्या समोर उभे आहेत… बंगालमध्ये राहुल गांधींच्या यात्रेला परवानगी नाही दिली… लोकांमध्ये जाण्यापूर्वीच विश्वास तोडणारे देश जिंकण्याच्या गप्पा मारताहेत.”

भाजपामुक्त देश करण्याकरता देशभरातील दोन डझनहून अधिक पक्ष एकत्र आले आहेत. या पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडीची स्थापना केली. या आघाडीचे नेतृत्त्व काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे करत आहेत. तर, या आघाडीकडून अद्यापही पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर झालेला नाही. परंतु, नितीश कुमार यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून पाहिलं जाऊ शकतं, अशी चर्चा सुरू होती. त्यातच, देशातील पाच राज्यांत झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला आलेल्या अपयशानंतर नितीश कुमारांनी इंडिया आघाडीविरोधात उघड उघड भूमिका घेतल्याचं स्पष्ट झालं. तर, आता त्यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडून बिहारमधील महागठबंधनमधूनही काढता पाय घेतला आहे. नितीश कुमारांच्या या भूमिकेमुळे इंडिया आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dinners together in a row today bjps attack on india aghadi over nitish kumars resignation sgk
First published on: 28-01-2024 at 13:02 IST