सांस्कृतिक संचालनालयाचे उपकेंद्र उपराजधानीत सुरू करण्यात येणार असून त्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची लवकरच नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. ‘तानी’ या मराठी चित्रपटाच्या प्रिमियर शोच्या निमित्ताने देवतळे नागपुरात आले असता ते बोलत होते. सांस्कृतिक संचालनालयाचे मुख्य कार्यालय मुंबईत असले तरी उपराजधानीत संचालनालयाचे उपकेंद्र व्हावे, अशी गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत असल्यामुळे नागपुरात उपकेंद्र स्थापन करून प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. हे उपकेंद्र स्थापन झाल्यावर येथील कलावंतांना मुंबईला जाण्याची गरज नाही.
समाज कल्याण विभागाकडून राज्य नाटय़ स्पर्धेची जबाबादारी काढून घेण्यात आली असून सांस्कृतिक संचालनालय स्थानिक नाटय़ परिषदेच्या माध्यमातून स्पर्धेचे आयोजन करणार आहे. कलावंतांना प्रोत्साहन मिळावे यासाठी पारितोषिकांची रक्कम वाढविण्यात आली आहे. स्पर्धेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. रंगभूमी आणि चित्रपट परीनिरीक्षण मंडळासह सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रातील राज्य मंडळावर नियुत्या करण्यात येणार आहे. विदर्भातील जास्तीत जास्त कलावंतांना समितीमध्ये स्थान देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले आहेत. साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील राज्य मंडळावर त्या त्या क्षेत्रातील कलावंत आणि साहित्यिकांचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विदर्भात थिएटरची संख्या वाढावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेतर्फे कविवर्य सुरेश भट यांच्या नावाने सभागृह तयार होत आहे. शिवाय काही जिल्ह्य़ात नाटय़गृहे स्थापन व्हावी यासाठी काही प्रस्ताव आले असल्याचे देवतळे म्हणाले. मुंबईला नव्याने ४५० एकर परिसरात फिल्म सिटी तयार करण्यात येत आहे. त्या ठिकाणी र्पयटन नगरी तयार करण्याचा प्रस्ताव आहे. अखिल भारतीय नाटय़ संमेलन उपराजधानीत आयोजित करण्याचा प्रस्ताव परिषदेकडे देण्यात आला असून त्याबाबतचा निर्णय परिषदेच्या बैठकीत घेतला जाईल, असेही देवतळे म्हणाले.
रसिकांना आवाहन
वऱ्हाडी बोली भाषेत आणि वेगळा आशय घेऊन तयार करण्यात आलेल्या तानी हा चित्रपटाची निर्मिती अतिशय सुरेख करण्यात आली असून सर्वच कलावंतांनी चांगली कामे केली आहेत. विदर्भातील कलावंतांनी तयार केलेल्या या चित्रपटाला रसिकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन संजय देवतळे यांनी केले. रिक्षाचालकांच्या जीवनशैलीवर आधारित तानी या चित्रपटाचा प्रिमियर शो लक्ष्मी चित्रपटगृहात आयोजित करण्यात आला. यावेळी देवतळे उपस्थित होते. मराठी चित्रपटाला सध्या चांगले दिवस असून विदर्भात आता चित्रपट निर्मिती होऊ लागली आहे. हिंदी राष्ट्रभाषा असली तरी आपल्या बोलीभाषेला तितकेच महत्त्व आहे त्यामुळे रसिकांनी हा चित्रपट बघावा, असे आवाहन त्यांनी केले. चित्रपट प्रदर्शनापूर्वी चित्रपटातील कलावंत मदन गडकरी, वत्सला पोलकमवार, केतकी माटेगावकर, देवेंद्र दोडके यांचा सत्कार करण्यात आला. चित्रपटाचे दिग्दर्शक संजीव कोलते यांनी चित्रपटाविषयी माहिती दिली. प्रिमियर शोला चित्रपटातील कलावंतांसह आमदार दीनानाथ पडोळे, शेफ विष्णू मनोहर, उपनिवासी जिल्हाधिकारी प्रमोद भुसारी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 18th May 2013 रोजी प्रकाशित
सांस्कृतिक संचालनालयाचे उपकेंद्र नागपुरात
सांस्कृतिक संचालनालयाचे उपकेंद्र उपराजधानीत सुरू करण्यात येणार असून त्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची लवकरच नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. ‘तानी’ या मराठी चित्रपटाच्या प्रिमियर शोच्या निमित्ताने देवतळे नागपुरात आले असता ते बोलत होते.
First published on: 18-05-2013 at 01:31 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Directorate of cultural substation at nagpur