सोलापूर : अमेरिकेतील विद्यापीठाची फुलब्राईट अभ्यासवृत्ती मिळाल्यानंतर अमेरिकेत जाऊन त्यासाठी सहा महिन्यांच्या अध्यापन रजा प्रकरणात अडचणीत येऊन वादग्रस्त ठरलेले अमेरिकेतील ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलांच्या प्रश्नपत्रिका तपासण्यासाठी ‘हॅक द क्लासरूम’ या नावाने एआय प्रयोग गुगल जेमिनीच्या मदतीने तयार केला आहे.
हा प्रयोग मराठी भाषेतून प्रश्नपत्रिका तयार करणे आणि त्यांची तपासणी करण्याच्या हेतूने तयार करण्यात आला आहे. त्यासाठी हार्वर्ड विद्यापीठातील इनोव्हेशन लॅबचे विशेष सहकार्य मिळाले आहे. २५ एप्रिल ३० एप्रिल या कालावधीत या एआय प्रयोगाची प्राथमिक चाचणी करण्यात आली. सोलापूर जिल्हा परिषदेच्या १२ शाळांमधील २२५ विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षेच्या उत्तरपत्रिका ‘एआय ‘च्या मदतीने तपासून अंतिम निकाल लावण्याचा संशोधन प्रकल्प नुकताच पूर्ण करण्यात आला आहे. याबाबतची माहिती स्वतः तंत्रस्नेही शिक्षक रणजितसिंह दिसले यांनी अमेरिकेमधून प्रसार माध्यमांना पाठविली आहे.
डिसले यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रयोगात २२५ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका संबंधित वर्गाचे शिक्षक आणि ‘ एआय ‘ अशा दोन्ही पद्धतीने तपासण्यात आल्या. एआयच्या (कृत्रिम बुद्धिमत्ता) माध्यमातून तपासण्यात आलेल्या उत्तर पत्रिकांमधून १२ टक्के मुलांच्या गुणात बदल झाल्याचे दिसून आले. हे बदल संबंधित शिक्षकांच्या तपासणीत अचूक असल्याचे पाहायला मिळाले. २० गुणांची एक उत्तरपत्रिका तपासण्यासाठी शिक्षकांना सरासरी एक मिनिट ४२ सेकंद तर ५० गुणांची उत्तरपत्रिका तपासण्यासाठी पाच मिनिटे २७ सेकंद लागत होते. मात्र ‘एआय’ने हेच काम ३२ सेकंदात पूर्ण केले. ‘एआय’ने तपासलेल्या उत्तरपत्रकांची अचूकता ९५ टक्के इतकी नोंदविण्यात आली. पाच टक्के विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर ओळखण्यास ‘एआय’ला अपयश आले. मुलांच्या उत्तरपत्रिका तपासत असतानाच दोन टक्के प्रश्न चुकीचे असल्याचेही एआयमुळे लक्षात आल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले.
उत्तरपत्रिका तपासल्यानंतर प्राप्त गुणांच्या आधारे संबंधित विद्यार्थ्यांना कौशल्य वृद्धीकरिता सहा आठवड्यांचे शिकवणी नियोजनसुध्दा एआय मॉडेलने दिले असून त्याची अंमलबजावणी १ मे ते १० जून या कालावधीत होत आहे. या उत्तरपत्रिका तपासणे आणि अंतिम निकाल तयार करणे, यासाठी शिक्षकांकडे पुरेसा वेळ नव्हता. त्यामुळे एआयचा वापर करून उत्तरपत्रिका तपासण्याचा प्रयोग करण्यात आला. छोट्या गटावर करण्यात आलेल्या प्रयोगाचे निकाल उत्साहवर्धक आहेत. त्यामुळे हे एआय मॉडेल अधिक सक्षम बनविण्यासाठी मदत होईल, असा विश्वास डिसले यांनी व्यक्त केला आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी (ता. माढा) येथील शाळेत सेवेत असताना रणजितसिंह डिसले यांच्या तंत्रस्नेही प्रयोगांची दखल घेऊन त्यांना अमेरिकेतील युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशनने जागतिक ग्लोबल टीचर पुरस्काराने गौरविले होते. त्यानंतर पुन्हा फुलब्राईट अभ्यासवृत्तीसाठी अमेरिकेत जाण्याकरिता सहा महिन्यांच्या अध्यापन रजेच्या प्रकरणात कायदेशीर बाबींची पूर्तता न केल्याने डिसले हे अडचणीत आले होते. परंतु शेवटच्या क्षणी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार डिसले यांची अध्यापन रजा विनाविलंब मंजूर झाली होती.