सांगली : शुक्रवारी पहाटे तीन वाजल्यापासून कृष्णेच्या पाण्याची पातळी ओसरू लागल्याने सांगलीकरांना दिलासा मिळाला आहे. चांदोली धरणातील विद्युतगृहातील १६३० क्युसेक वगळता पूर्ण विसर्ग थांबवण्यात आला आहे, तर कोयनेतील विसर्ग कमी करण्यात आला आहे. त्यामुळे शनिवारी दुपारपर्यंत कृष्णेच्या पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा कमी होईल, असा अंदाज आहे. आता पूरग्रस्त भागातील स्वच्छतेचे मोठे आव्हान महापालिकेबरोबरच येथील रहिवाशांसमोर आहे.

पश्चिम घाटात पावसाचा जोर कमी झाला असून, यामुळे धरणातील विसर्ग कमी करण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी होत असली, तरी याची गती अत्यल्प आहे. गुरुवारी रात्री सात वाजता आयर्विन पुलाजवळ पाणीपातळीने ४३ फूट ६ इंच ही सर्वोच्च पातळी गाठली होती. त्यानंतर ही पातळी मध्यरात्री तीनपर्यंत स्थिर होती. यानंतर पाणी पातळी कमी होण्यास सुरुवात झाली असून, शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत पाणीपातळी ४० फूट ६ इंच होती. दर तासाला दोन ते तीन इंचांनी पाणीपातळी कमी होत आहे. शनिवारी दुपारपर्यंत पाणी पात्रात परतेल, असा अंदाज आहे.

दरम्यान, पूरग्रस्त नागरिकांनी निवारा केंद्रात आश्रय घेतला असून, या ठिकाणी महापालिकेच्या वतीने पूरग्रस्तांची निवास व भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आरोग्य पथकही तैनात करण्यात आले आहे. शहरात चार ठिकाणी पूरग्रस्तांसाठी निवारा केंद्रे सुरू करण्यात आली असून, त्यांमध्ये ५०० हून अधिक नागरिकांनी आसरा घेतला आहे.

नदीचे पाणी ओसरू लागताच अनेकांनी आज आपल्या घराची पाहणी केली. मात्र, अद्याप घरादारांत पाणी साचले असल्याने परत फिरावे लागले. जुन्या बुधगाव रस्त्यावर काही प्रमाणात पाणी ओसरले असल्याने नागरिकांनी स्वच्छता करण्याचा प्रयत्न चिखलामुळे अशक्य ठरला. पाणी ओसरताच पूरग्रस्त भागात स्वच्छतेसाठी महापालिकेने यंत्रणा सज्ज ठेवली असून, कीटकनाशक फवारणी करण्याची तयारी केली आहे.

दरम्यान, वारणा व कृष्णाकाठावरील शेतांत पाणी शिरल्याने शेकडो एकर जमिनीवरील ऊस, सोयाबीन, भुईमूग आदींसह भाजीपाला पिके पाण्याखाली गेली आहेत. पिकात पाणी साचून राहिल्याने पिके कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. पूरग्रस्त शेतीचे पंचनामे अद्याप सुरू करण्यात आलेले नाहीत. यामुळे निश्चित किती नुकसान झाले, हे समजण्यास अजून दोन दिवसांचा अवधी लागेल, असे कृषी विभागातून सांगण्यात आले. शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत पाणीपातळी ४० फूट ६ इंच होती. दर तासाला दोन ते तीन इंचांनी पाणीपातळी कमी होत आहे. शनिवारी दुपारपर्यंत कृष्णेच्या पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा कमी होईल, असा अंदाज आहे. आता पूरग्रस्त भागातील स्वच्छतेचे मोठे आव्हान महापालिकेबरोबरच येथील रहिवाशांसमोर आहे.