नांदेड: दिवंगत बळवंतराव आणि वसंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यांच्या अनावरणानिमित्त काँग्रेस नेत्यांची लक्षणीय उपस्थिती असलेल्या मांदियाळीत या पक्षाचे माजी मुख्यमंत्री, पण आता भाजपात असलेले भोकरचे नेते खा.अशोक चव्हाण हेही मंगळवारी नायगाव येथे गेले. जुन्या सहकार्यांच्या भेटीबद्दल त्यांनी आनंदही व्यक्त केला; पण त्यांच्यात ते रमले नाहीत.
नायगाव नगरीचे दीर्घकाळ पालकत्व केलेल्या वरील दोन नेत्यांच्या स्मरणार्थ झालेल्या कार्यक्रमास व्यासपीठावर काँग्रेससह सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती होतीच आणि समोरच्या मंडपात मोठा जनसमुदाय जमला होता. त्यांत सहभागी झालेल्या चव्हाण यांनी हैदराबादला जाऊन विमान गाठायचे असल्याचे कारण देत औपचारिक भाषण करून सर्वांचा निरोप घेतला.
या दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अन्य काँग्रेस नेत्यांनी पक्ष सोडून गेलेल्या चव्हाणांची विशेष नोंद घेतली नाही; पण गतवर्षी पक्ष अडचणीत असताना लोकसभा निवडणूक लढवून काँग्रेसचा झेंडा फडकविणार्या दिवंगत वसंतरावांच्या राजकीय कर्तबगारीची सार्यांनीच प्रशंसा केली.
वरील कार्यक्रमापूर्वी नांदेड येथे वंदे भारत एक्सप्रेसच्या शुभारंभप्रसंगी खा.चव्हाण यांनी मागील काळातल्या रेल्वेविषयक एका मुद्यावरून लातूरच्या देशमुख नेत्यांवर टीका केली होती. या देशमुखांतील आ.अमित देशमुख आणि अशोक चव्हाण नायगावच्या व्यासपीठावर एकमेकाच्या शेजारी स्थानापन्न झाले होते. तेथे त्यांच्यामध्ये संवाद झाला; पण चव्हाण यांनी नांदेडमध्ये केलेल्या थेट टीकेला देशमुख यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. त्याचवेळी वसंतरावांचे पुत्र खा.रवींद्र चव्हाण यांचे राजकीय भविष्य उज्ज्वल असल्याचे त्यांनी नमूद केले.
नायगावचा कार्यक्रम पक्षीय स्वरुपाचा नव्हे तर दोन दिग्गज नेत्यांच्या स्मरणात होता. पण या व्यासपीठावरील अमित देशमुख, प्रताप पाटील चिखलीकर किंवा अन्य वक्ते आपल्या राजकीय कृतीवर काही तरी भाष्य करतील, असा अंदाज बांधून खा.चव्हाण यांनी वक्त्यांच्या यादीत आपला क्रम सर्वप्रथम घ्यायला लावला आणि भाषण आटोपताच ते हैदराबादकडे रवाना झाले. बळवंतराव आणि वसंतरावांच्या काही आठवणी त्यांनी जागवल्या. राजकीय विचार, पक्ष बदलला असला, तरी वैयक्तिक संबंधातून येथे उपसिथत राहिल्याचे त्यांनी सांगितले.
वरील कार्यक्रमास ज्येष्ठ नेते खा.शरद पवार उपस्थित राहणार होते, पण नांदेडचे विमानतळ बंद झाल्यामुळे त्यांचा नियोजित दौरा रद्द करावा लागला. त्यांच्या अनुपस्थितीत काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार छ.शाहू महाराज यांच्या हस्ते बळवंतराव आणि वसंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यांचे अनावरण तसेच दोघांच्या स्मृतिस्थळांचे उद्घाटन करण्यात आले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह या पक्षाचे गोवा राज्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी मंत्री कमलकिशोर कदम, माधवराव किन्हाळकर, विश्वजीत कदम, खा.कल्याण काळे, खा.डॉ.शिवाजी कळगे, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आ.प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह काँग्रेस तसेच विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी व्यासपीठावर हजर होते. या सर्वांचे चव्हाण परिवारातर्फे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक प्रा.रवींद्र चव्हाण यांनी केले.