दिगंबर शिंदे, सांगली

पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्याने दुष्काळग्रस्त भाग टँकरच्या आशेवर सध्या तहान भागवू लागला आहे. परंतु टँकरने पुरविण्यात येणाऱ्या पाण्याची शुद्धता तपासण्याची कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नसल्याने दुष्काळी भागात सध्या आजारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावर पर्याय म्हणून अनेक ठिकाणी टँकरचे पाणी अन्य गरजांसाठी आणि पिण्यासाठी बाटलीबंद पाणी वापरले जात आहे. यातून दुष्काळी भागात बाटलीबंद पाण्याचा नवा व्यवसाय उदयास आला आहे.

जिल्हय़ात जत, कवठेमहांकाळ, तासगाव, आटपाडी आणि खानापूर या पाच तालुक्यांत तीव्र दुष्काळ जाहीर केला आहे. जिल्हय़ात ४७६ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करून टंचाईतील सवलती जाहीर करण्याबरोबरच मागेल तिथे टँकरने पाणी पुरवण्याचे शासनाचे धोरण आहे.

सध्या ७० गावे ४६६ वाडीवस्तीवरील १ लाख ४८ हजार लोकांना ७० टँकरने पाणी पुरविण्यात येत असून, हे पाणी पुरवठा करण्यासाठी खासगी टँकरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या टँकरमध्ये भरण्यासाठी पाण्याचे काही स्रोतही निश्चित करण्यात आले असून, यासाठी ८९ विहिरी अणि कूपनलिका शासनाने अधिगृहीत केल्या आहेत. टँकर चालकाने प्रतिखेप किमान १० हजार लीटर पाणी पुरवठा करणे अपेक्षित आहे. यावर संबंधित गावच्या सरपंच, ग्रामसेवक यांची पोहोच रजिस्टर घ्यायची आहे. यासाठी शासनाकडून प्रतिटन ३९० रुपये किमान भाडे आणि वाहतूकपोटी प्रतिटन ३ रुपये २० पैसे असा दर निश्चित करण्यात आला आहे. नजीकचा पाण्याचा स्रोत महसूल विभागाने निश्चित करून दिल्यानंतर त्याची भाडे आकारणी छोटे पाटबंधारे विभागाने करून देयक अंतिम तयार करून महसूल विभागाकडे पाठवायचे ही पद्धत आहे.

मात्र बऱ्याच वेळा टँकरचालक जवळच मिळेल तिथून आणि आहे तसे पाणी भरून त्याचे वितरण करतात. मग बऱ्याच वेळा हे पाणी अशुद्ध, अस्वच्छही असते. पण जवळूनच पाणी भरत या खेपा मात्र मूळ ठरवून दिलेल्या स्रोतापासून आणल्याचे दाखवत जादा रकमेची देयके आकारली जातात. टँकरमध्ये पाणी भरताना ते शुद्ध करत भरणारी यंत्रणा कुठेच अस्तित्वात दिसत नाही. मग हे अशुद्ध पाणी पिल्यामुळे या भागात सध्या मूत्रविकार, उदर विकाराचे रुग्ण वेगाने वाढत आहेत.