दिगंबर शिंदे, लोकसत्ता 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांगली : सांगली महापालिकेच्या जागेवर उभारण्यात आलेल्या अहिल्यादेवी स्मारकाच्या लोकार्पणावरून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा उघड संघर्ष निर्माण झाला आहे. या स्मारकांचे लोकार्पण २ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले असून त्याला भाजपने  विरोध दर्शवत तत्पूर्वीच २७ मार्च रोजी लोकार्पण करण्याचा इशाराही दिला आहे.

 महापालिकेने विजयनगर परिसरातील सुमारे  ३० हजार चौरस फुटांच्या भूखंडावर अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक उभारले आहे.  २०१० पासून या स्मारकाचे काम सुरू होते. आता ते पूर्ण झाले असून यासाठी अडीच कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. या जागेवर अहिल्यादेवींचे स्मारक, अतिथिगृह, वाचनालय इमारत उभारण्यात आले असून खुल्या जागेत बागही तयार करण्यात आली आहे.

या ठिकाणी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी अभ्यासिका असावी, त्यासाठी लागणारी पुस्तके असावीत अशी या मागे कल्पना असल्याचे या विभागाचे लोकप्रतिनिधी विष्णू माने यांनी सांगितले. स्मारक उभारणीसाठी त्यांचाच आग्रह होता. यामध्ये सर्वच पक्षाच्या नगरसेवकांचे सहकार्य लाभले असल्याचेही  त्यांनी सांगितले.  या स्मारकाचे लोकार्पण २ एप्रिल रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. पवार यांच्या हस्ते होणार असल्याचे जाहीर होताच, भाजपला जाग आली आणि मतांची बेरीज वजाबाकीकडे जाते की काय अशी धास्ती मनात आल्यानंतर या कार्यक्रमाला विरोध सुरू करण्यात आला आहे. जाहीर कार्यक्रम  होण्यापूर्वीच पाच दिवस  अगोदर भाजपचे कार्यकर्ते लोकार्पण करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या स्मारकाचे लोकार्पण पवारांच्या हस्ते करण्यास विरोध करण्यामध्ये सध्या भाजपचे प्रवक्ते आ. गोपीचंद पडळकर हे आघाडीवर आहेत. मात्र त्यांनी चालविलेला विरोध हा केवळ राजकीय द्बेषातून असल्याचा आक्षेप राष्ट्रवादीचा आहे. जर समाजाबाबत एवढी आस्था असेल तर आरेवाडीच्या बिरोबा बनात शपथ घेऊन भाजपवर तोंडसुख घेणाऱ्या आ. पडळकरांनी आमदार निधीतून स्वतंत्र वास्तू निर्माण करावी असे आव्हान राष्ट्रवादीकडून देण्यात येत आहे. स्मारकाचे राजकीय श्रेयावरून हे चालू असताना महापालिकेत संख्याबळ जास्त  असतानाही सत्ता स्थापनेत दुय्यम स्थान घेतलेल्या काँग्रेसनेही लोकार्पण सोहळय़ावर फारसे स्वारस्य दाखवलेले नाही.

 लोकार्पण सोहळा हा जणू राष्ट्रवादीचाच कार्यक्रम आहे, आमची त्यात लुडबुड काय कामाची अशीच भूमिका सध्या काँग्रेसची दिसत आहे. या कार्यक्रमात विश्वासात न घेता नियोजन करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून होत आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांना आमंत्रित करावे अशी काँग्रेसची भूमिका असली तरी यासाठी महापौरपद राष्ट्रवादीकडे असल्याने त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे असे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचे मत आहे.  अहिल्यादेवी स्मारकाचे लोकार्पण करण्यावरून सांगलीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष निर्माण झाला असून यात काँग्रेसची बघ्याची भूमिका दिसत आहे. महापालिकेची वास्तू असल्याने प्रशासनानेच या लोकार्पण सोहळय़ाची निमंत्रणपत्रिका काढणे नियमानुसार असले तरी भाजपची भूमिका आणि सत्ताधारी आघाडीची भूमिका परस्पर विरोधी असल्याने राजकीय श्रेयवादाने प्रशासनाची कोंडी झाली आहे.

अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक हे सांगलीसाठी भूषणावह वास्तू ठरणार आहे. भाजपने या स्मारकाच्या लोकार्पणावरून निर्माण केलेला श्रेयवाद अनाठायी असून केवळ कार्यक्रमावरून राजकारण करणे हा भाजपचा इतिहासच आहे. महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्ष या लोकार्पण सोहळय़ात सहभागी होतील.

– पृथ्वीराज पाटील, शहर जिल्हाध्यक्ष, काँग्रेस</strong>

महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता असताना पालकमंत्री जयंत पाटील यांनी या स्मारकास मान्यता मिळवून देण्यात पुढाकार घेतला  होता. भाजपच्या पायाखालील वाळू  सरकू लागल्याने लोकार्पणसारख्या कार्यक्रमाचे राजकारण केले जात असून हे हातची सत्ता गमवावी लागल्याने निर्माण झालेल्या नैराश्यातून राजकीय वाद उत्पन्न केला जात आहे. 

– संजय बजाज, शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी

भाजपच्या  सत्ताकाळात अहिल्यादेवी स्मारकाला निधी उपलब्ध करून देण्यात आला. भाजपच्या नगरसेवकांनीही पक्षीय मतभेद बाजूला सारून स्मारक उभारणीस भरीव सहकार्य केले असून काही पक्षांनी आयोजित केलेला लोकार्पण सोहळा म्हणजे आयत्या पीठावरील रेघोटय़ा आहेत.

– दीपक िशदे,

शहर जिल्हाध्यक्ष, भाजप

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dispute between bjp and ncp over ahilya devi holkar memorial inauguration zws
First published on: 24-03-2022 at 01:49 IST