मीरा रोड परिसरातील नया नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीबरोबर चपलेवरून वाद झाल्यानंतर एका ५४ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच नया नगर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्राथमिक माहितीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अफसर खत्री असं मृत पावलेल्या ५४ वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. तर समीर रुपाणी असं आरोपीचं नाव आहे. मृत अफसर खत्री आणि आरोपी समीर रुपाणी यांच्या कुटुंबात मागील काही दिवसांपासून धुसपूस सुरू होती. घटनेच्या दिवशी दोन्ही कुटुंबात चपलेवरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी समीरने मृत खत्री यांना मारहाण केली.

हेही वाचा- “…तर मी मानहानीचा दावा ठोकणार”, उद्धव ठाकरेंच्या सभेआधी रामदास कदमांचा इशारा

मारहाण झाल्यानंतर खत्री आपल्या घरात आले आणि जमिनीवर कोसळले, यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक लोकांनी दिली आहे. अफसर खत्री जमिनीवर कोसळल्यानंतर त्यांच्या पत्नीने मदतीसाठी आरडाओरडा केला. तसेच डॉक्टरांना पाचारण करण्यात आलं. पण डॉक्टरांनी घटनेचं गांभीर्य ओळखून खत्री यांना तातडीने रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. स्थानिक रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथील डॉक्टरांनी खत्री यांना मृत घोषित केलं.

हेही वाचा- अमेरिकेहून येणाऱ्या विमानात भारतीय विद्यार्थ्याने केली लघुशंका, मद्यधुंद अवस्थेत सहप्रवाशावर…

अफसर खत्री यांचा मृत्यू झाल्याचं कळताच आरोपी समीर आपल्या कुटुंबासह फरार झाला आहे. याप्रकरणी नया नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.