नंदुरबार

अतिशय तुटपुंज्या साधनसामग्रीवर १ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्यातून नंदुरबार वेगळा झाला. मोठय़ा प्रमाणावर डोंगर-दऱ्या असलेला हा जिल्हा तारुण्यावस्थेत येईपर्यंत रस्ते, आरोग्य व्यवस्थेचे जाळे विणले गेले. बालमृत्यू आणि कुपोषणाच्या प्रश्नांवर सामाजिक संघटनांनी सातत्याने आवाज उठविल्यानंतर प्रशासनाने उणिवा दूर करण्यावर विशेष लक्ष दिले. त्यामुळे गेल्या दशकभरात मोठे सकारात्मक बदल घडले. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात ५०० किलोमीटरहून अधिक रस्त्यांचे जाळे विणले गेले. सुमारे ८० टक्के खेडी मुख्य रस्त्यांनी जोडली गेली आहेत. त्यामुळे दुर्गम भागात बदल घडत आहेत.  

सोलापूर

एकेकाळी दुष्काळी पट्टा म्हणून सोलापूरची राज्यभर ओळख. गेल्या काही वर्षांत मात्र कृषी क्षेत्रातील प्रगती आणि त्यास उद्योग, दळणवळणाच्या सुविधांनी साथ दिल्याने जिल्ह्याने लक्षणीय भरारी घेतली आहे. राज्यात सर्वाधिक ऊस – साखर उत्पादन, सर्वाधिक साखर कारखाने, शेतीला मिळालेली फळबाग लागवडीची यशस्वी जोड यामुळे जिल्ह्याने प्रगतीचा मार्ग धरला आहे. हा कायापालट होण्यास महाकाय उजनी धरणाचे योगदान उल्लेखनीय ठरले आहे.   दुसरीकडे पंढरपूर, अक्कलकोटसह शेजारच्या तुळजापूर, गाणगापूर आदी प्रसिध्द तीर्थक्षेत्रांमुळे सोलापूरच्या पर्यटन विकासाला मोठी चालना मिळत आहे. 

नागपूर

दोन दशकांत जगात सर्वाधिक वेगाने आर्थिक प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नागपूरची गणना होऊ लागली आहे. पंचतारांकित सुविधायुक्त औद्योगिक वसाहत, मिहान-सेझमधील माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, शैक्षणिक क्षेत्रात आयआयएम, ट्रिपल आयटी, नॅशनल लॉ स्कूल, सिम्बायोसिस विद्यापीठ, आरोग्य क्षेत्रात एम्स, देशाच्या चारही दिशांना जोडणारी दळणवळण यंत्रणा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणारी मेट्रो रेल्वे, समृद्धी महामार्ग, ड्राय पोर्ट अशा विविध क्षेत्रांतील सुविधांमुळे नागपूरची वाटचाल आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहराकडे सुरू आहे.   

सातारा

पर्यटन, धार्मिक स्थळे आणि शेतीचा जिल्हा अशी ओळख असलेला सातारा आता उद्योग क्षेत्रातही भरारी घेत आहे. गेल्या पंधरा वर्षांत पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाच्या जोरावर हे यश मिळाले. छोटय़ा-मोठय़ा उद्योगांपासून विशेष आर्थिक क्षेत्रापर्यंत (सेझ) उद्योगांचे जाळे पसरले आहे. यातून रोजगाराच्याच संधी, नागरीकरण आणि अर्थकारणाला गती मिळाली आहे.  मागील  दहा वर्षांतच जिल्ह्यातील फलटण, खंडाळा भागात विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) आकारास आले. जोडीने सातारा, वाई, कराड (तासवडे), लोणंद, फलटण आणि कोरेगाव येथील औद्योगिक वसाहतींनीदेखील कात टाकली आहे. 

मुंबई

मुंबई.. महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची असलेली आर्थिक राजधानी.. वेगाने सुरू असलेली विकासकामे आणि पायाभूत सुविधांमुळे मुंबई कात टाकते आहे. शहरात मेट्रोचे जाळे विणण्याबरोबरच पूर्व आणि पश्चिम उपनगरे एकमेकांशी जोडण्यावर गेल्या काही वर्षांत भर दिला गेला. रस्त्यांसोबतच जलमार्ग व्यवहार्य ठरावा यासाठी प्रयत्न सुरू झाले. शहर अधिक गतिमान, आकर्षक करण्यासाठी प्रयत्न होत असून ्र त्याला यश येताना दिसते आहे. 

अमरावती

ग्रामीण भागात विस्तारणारे रस्त्यांचे जाळे, महिला व बाल आरोग्यातील सुधारणा, गृहनिर्मिती क्षेत्रातील उद्दिष्टपूर्ती, वस्त्रोद्योगात आगेकूच ही अमरावती जिल्ह्याची नवी ओळख बनते आहे.  नांदगावपेठच्या औद्योगिक वसाहतीने वस्त्रोद्योगासाठी नवे दालन खुले करून दिले. १३ मोठे उद्योग स्थापन झाले. औद्योगिक केंद्र म्हणून झपाटय़ाने शहर आणि जिल्हा विकसित होताना दिसतो.   राज्याची स्थापना झाली त्या वेळी जिल्ह्यात केवळ १,२२५ किलोमीटरचे रस्ते होते. ही लांबी आता ८ हजार ४१२ किलोमीटपर्यंत पोहोचली. म्हणजे सहा दशकांपुर्वी दर १०० चौरस किलोमीटर क्षेत्रामागे रस्त्यांची लांबी ही फक्त १० किलोमीटर होती, ती आता ६९ किलोमीटपर्यंत विस्तारली आहे.

परभणी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मिळालेली मंजुरी, अडखळत का होईना पण सुरू असलेली राष्ट्रीय महामार्गाची कामे, गोदावरीच्या पात्रातील बंधारे, निम्न दुधना धरणाच्या कालव्यांची झालेली कामे, जिल्ह्यात काही तरुण शेतकरी उद्योजकांनी उभारलेले छोटे- मोठे उद्योग या सकारात्मक गोष्टी ही परभणी जिल्ह्यातली अलीकडच्या काळातील जमेची बाब आहे.  नियोजित विज्ञान संकुल हे विज्ञानातील विविध विद्याशाखांचा समावेश असलेले   दालन तयार करण्यात येणार असून यास भविष्यात ज्ञानगंगेचे स्वरूप प्राप्त होईल.  नवे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्यास संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय स्थापन करण्याबाबतचा  निर्णय घेण्यात आला आहे.

नांदेड

मराठवाडय़ात औरंगाबादनंतरचे मोठे आणि महत्त्वाचे शहर म्हणजे नांदेड.  २०१४ पर्यंत जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी २५८ कि.मी. होती. त्यात आणखी ५०८ कि.मी.ची भर पडली आहे.  शेजारच्या अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत नांदेड येथे आरोग्याच्या सुविधा चांगल्या आहेत.  नांदेड जिल्ह्यात मागील काही वर्षांमध्ये योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यावर अधिकाऱ्यांनी भर दिला.  त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. 

लातूर

उस्मानाबाद जिल्ह्याच्या विभाजनानंतर निर्माण झालेल्या लातूरने विकासाच्या दिशेने अतिशय वेगाने वाटचाल केली.  भुईमूग, सूर्यफूलानंतर देशात सोयाबीनचा सर्वाधिक पेरा करणारा हा दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे.  डाळमिलचे गाव म्हणूनही लातूरने आपली ओळख टिकवली असून तूर व हरभरा डाळींचे भाव लातूरच्या बाजारपेठेवर अवलंबून असतात. जिल्ह्यात डझनभर साखर कारखाने कार्यरत आहेत.  

महाराष्ट्रातील जिल्ह्यंच्या प्रगतीचा आलेख मांडणारा ‘जिल्हा निर्देशांक’ हा उपक्रम ‘लोकसत्ता’ने हाती घेतला. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, नागरीकरणे, पायाभूत सुविधा, कायदा-सुव्यवस्था अशा सर्व स्तरांवर जिल्ह्यंच्या गती-प्रगतीचे मोजमाप करण्यात आले. हाती आलेल्या सांख्यिकी माहितीला शब्दरूप देऊन त्यातून काही जिल्ह्यंचा वृत्तालेख मांडणारी मालिका चालवण्यात आली. या मालिकेचा घेतलेला संक्षिप्त वेध..