कर्जमाफी दिवाळीपूर्वी अशक्य असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी येथे शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. तसेच यवतमाळ येथे फवारणीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाने दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. मृत्यूची किंमत पैशात मोजता येत नाही, मात्र अधिकाधिक मोबदला मिळावा यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज महाकर्जमाफी अंतर्गत दाखल केलेल्या अर्जाची सद्यस्थिती, बँकांमधील या संदर्भात सुरू असलेली कामे, चावडी वाचनाच्या कार्यक्रमाचा आढावा दिवाकर रावते यांनी घेतला. त्यांनी जिल्हय़ाच्या महाकर्जमाफी संदर्भात आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत आमदार बाळू धानोरकर होते.  बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी, विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी अधिकाऱ्यांशी चर्चा करतांना त्यांनी ऑनलाईन अर्जाच्या संदर्भातील संपूर्ण डाटा तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे शक्य तेवढय़ा लवकर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, यासाठी यंत्रणा वाढवण्याचे आवाहनही त्यांनी केले. चंद्रपूर जिल्हय़ामध्ये कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले असून मोठय़ा संख्येत कर्जाची परतफेडी करणाऱ्यांना देखील योजनेतील तरतुदींचा लाभ मिळावा, असे निर्देश त्यांनी दिले. यवतमाळ जिल्हय़ातील शेतकरी फवारणी करतांना विषबाधा होवून मृत्युमुखी पडल्याच्या घटनेबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले.

कृषी विभागाच्या या संदर्भात जनजागृती मोहीम राबविण्यात यावी. जिल्हय़ामध्ये अशा पध्दतीच्या घटना घडू नये, यासाठी कृषी विभाग व आरोग्य विभागाने लक्ष द्यावे, दिवाळीपूर्वी कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांना मिळणे शक्यच नाही, तरीही राज्य सरकार विविध पातळय़ांवर प्रयत्न करीत आहे, असे त्यांनी सांगितले.