आम्ही उद्योगिनी

‘आम्ही उद्योगिनी’च्या यंदाच्या दिवाळी अंकाचे १८ वे वर्ष. यंदाच्या अंकाचे वैशिष्टय़ म्हणजे दिवाळीतील फराळ आणि दागिने यांच्या उद्योगातून भरारी घेणाऱ्या स्त्रियांच्या मुलाखती. घरगुती स्तरावर पदार्थ बनवता बनवता त्यातून उद्योग कसा उभा राहू शकतो. इतकेच नाही तर थेट परदेशांतही हे पदार्थ कसे लोकप्रिय होत आहेत याच्या प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासारख्या आहेत. या विशेष भागाशिवायही काही महत्त्वाचे लेख मुळातूनच वाचण्यासारखे आहेत. एक अशिक्षित स्त्री बेअरफूट कॉलेजच्या माध्यमातून सौर ऊर्जेचा उत्तम नमुना तयार करते. आणि पुढे जाऊन जपानच्या मदतीने महाराष्ट्र सरकार त्याची निर्मिती करू इच्छिते हे वाचले की स्त्रीच्या ताकदीची कल्पना येते. सैनिकांचे स्मरण करून देणारे लक्ष्य फाऊंडेशन, अरुणाताई भट यांचे नव उद्योजकांना उद्देशून केलेले मनोगत हे लेख वाचनीय आहेत. स्त्री उद्योजिकांची उद्योगातील भरारी वाचायची असेल तर ‘आम्ही उद्योगिनी’चा दिवाळी अंक वाचायलाच हवा.
संपादक : मीनल मोहाडीकर
मूल्य : ५० रुपये.
0
आपला डॉक्टर
प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये डॉक्टर महत्त्वापूर्ण घटक आहे. कारण काळानुरूप आणि बदलत्या जीवनशैलीत डॉक्टरांचे महत्त्व अधिकच अधोरेखित होत आहे, कारण हा घटक आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहे. पण संपादक सौ. शीतल मोरे यांनी ‘आपला डॉक्टर’ या पुस्तकरूपी दिवाळी अंकातून वाचकवर्गाशी साधलेला संवाददेखील तितकाच महत्त्वपूर्ण असल्याचे, या अंकात मांडण्यात आलेल्या विषयातून ठळकपणे दिसत आहे. मधुमेहाने जीवनशैलीवर केलेल्या आघाताची दाहकता मांडण्यात ‘आपला डॉक्टर’ नक्कीच यशस्वी झाला आहे. या अंकातून मधुमेहाबाबत असलेला दृष्टिकोन बदलण्यास उपयुक्त असे मार्गदर्शन होते. तसेच या आजाराविषयीची कारणे, उपचारपद्धती, आहार याबाबत सविस्तर संवाद साधला गेला आहे. विशेष म्हणजे आरोग्याशी निगडित आणि मधुमेह या विषयाला केंद्रस्थानी ठेवताना कोणत्याही प्रकारचा रटाळपणा टाळण्यात संपादक यशस्वी झाल्या आहेत. तर अंकाची भाषा सहज आणि सोपी ठेवताना मधुमेहाविषयी समाजप्रबोधनात ‘आपला डॉक्टर’ दिवाळी अंक यशस्वी झाला आहे.
संपादक : शीतल मोरे
किंमत : १०० रुपये.
0
मेजवानी
नवनवीन पदार्थ करण्याची आवड असलेल्या गृहिणींसाठी या अंकात यंदा उपवासाचे नवनवे पदार्थ कसे तयार करता येतात याची कृती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नाश्त्यामध्ये ग्रीन डोसा, बटाटा शिरा, चमचम कटलेट, सोया चंक असे पदार्थ तर भोजनामध्ये आंबाडाळ, स्टफ फ्लॉवर, बैंगन बोट, बैंगन टिक्की असे नावीन्यपूर्ण पदार्थ कसे करावे हे सांगितले आहे. पनीरच्याही नानाविध पाककृतींची माहिती अंकात मिळते. सॅलडमधील विविधता, मिष्ठान्नांमध्ये स्वीट जर्दाळू, रवा केक, आमरस साखरभात, बटाटा चमचम, गाजराचे पुडिंग पदार्थ स्वादिष्ट झाले आहेत. चटपटीत मांसाहार, मत्स्याहारही खाणाऱ्यांसाठी रुचकर आहे. नोकरी, व्यावसायानिमित्त जाणाऱ्या आपल्या कुटुंबीय सदस्यांना रोज डबा काय द्यावा हा नेहमी चिंतेचा विषय असतो, परंतु ही चिंता ‘मेजवानी’ने मिटविली आहे. डब्यात काय असावेपासून डबा भरताना घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. स्वप्निल वाडेकर आणि वैद्य खडिवाले यांनी स्त्रियांच्या आरोग्याबाबत लिहिलेल्या लेखांमधून विविध आजारांबाबत घ्यावयाची काळजी मांडली आहे.
संपादक : अश्विनी साळवी
किंमत : ४० रुपये.