अहिल्यानगर : नव्या पिढीतील प्रतिभावंत गायक प्रथमेश लघाटे व शाल्मली सुखटणकर या युवा गायकांनी प्रर्थना, भजन, नाट्य, भावगीत, गझल, लावणी, हिंदी गीते व भैरवी अशा अनेकविध गाण्यांनी रंगवलेली दीपावली सरगम संगीत मैफल नगरकर रसिकांना मंत्रमुग्ध करून गेली. अवीट गाण्यांनी नगरकरांची पहाट सुरमई झाली. या मैफलीस विविध क्षेत्रातील रसिक नागरिकांनी उपस्थिती लावली.
दीपावलीनिमित्त येथील विचार भारती व चैतन्य फाउंडेशन या संस्थांनी आयोजित ‘एक दिवाळी पहाट वेळी…’ संगीतमय मैफलीत प्रथमेश व शाल्मली या गायकांनी नगरकरांचा दीपावलीचा आनंद द्विगुणित केला. मैफलीत अनेकविध प्रकारांतील मराठी गाण्यासह काही गाजलेली हिंदी गाणीही त्यांनी सादर केली. कलावंत अभिजीत कुलकर्णी यांच्या खुमासदार निवेदनाने मैफलीचे सप्तसुर उजळवून गेले. अखंड भारताच्या नकाशाभोवती रसिकांनी दीप प्रज्वलित करून दिपोस्तव साजरा केला.
गायक प्रथमेश लघाटे व शाल्मली सुखटणकर यांनी ‘गगन सदन तेजोमय…’ या प्रार्थनेने सुरू झालेल्या मैफिलीत नाट्य संगीताला १४५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ‘जय शंकरा गंगाधरा…’ हे पद सादर केले. तसेच भक्ती गीते रसिकांकडून टाळ्यांची दाद मिळवून गेली. कट्यार काळजात घुसली या संगीत नाटकातील ‘सुरत पिया की…’ या गाण्याने ‘वन्समोर’ची दाद मिळवली. भावगीते, गझल, लावण्या व त्यासोबतचा ढोलकीचा ठेका शिट्ट्यांची दाद मिळवून गेला. नंतर हिंदी गाण्यांनी मैफलीची रंगत वाढवली. ‘अवघा रंग एक झाला’ व ‘जो भजे हरी को सदा…’ या भैरवीने मैफलीची सांगता झाली.
विचार भारतीचे अध्यक्ष अरुण कुलकर्णी यांनी स्वागत करून उपक्रमांची माहिती दिली. चैतन्य फाउंडेशनचे अध्यक्ष अनंत देसाई, विचार भारतीचे सचिव सुधीर लांडगे, अशोक गायकवाड, अनिल मोहिते, विशारद पेटकर, उदय भणगे यांनी मैफलीचे संयोजन केले. संगीत संयोजन सचिन इंगळे व अविनाश कुलकर्णी यांचे होते. विवेक परांजपे, दर्शना जोग, प्रतीक गुजर, रोहित जाधव, सुनील पानसरे यांनी वाद्यांची साथसंगत केली. विचार भरती व चैतन्य फाउंडेशन यांनी गेल्या वर्षभरात रसिकांना संगीत व गायनाची मेजवानी देणारे अनेक मैफलीचे कार्यक्रम सादर केले आहेत.