लातूरच्या उदगीर नगरीत ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. छत्रपती शाहू महाराज सभागृहात व डॉ. ना.य. डोळे व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या हस्ते सकाळी साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं. उद्घाटनापूर्वी सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी चौकातून ग्रंथदिंडी काढण्यात आली होती. प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानपीठ विजेते कादंबरीकार दामोदर मावजो यांनी उपस्थिती लावली असून यावेळी त्यांनी परखड मत मांडलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सत्तेचा माज चढला की निर्बंध लादले जातात अशी टीका यावेळी त्यांनी केली. अशावेळी साहित्यिक गप्प का बसतात? असा सवालही यावेळी त्यांनी विचारला. आज साहित्यिकांमध्येहेही चिअर लीडर्स तयार झालेत. ते सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक कृतीला गुमान प्रोत्साहन देतात अशी खंतही यावेळी त्यांनी बोलून दाखवली.

यावेळी त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करत Delhi Riots 2020: The Untold Story या पुस्तकारील बंदी आणि काश्मीर फाईल्स चित्रपटाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, “पुस्तकावरील बंदी रास्त होती का? काश्मीर फाईल्स चित्रपटात एकतर्फी चित्रण दाखवलं, अर्धसत्य आहे असं काहींचं म्हणणं असून त्यावरुन वाद सुरु आहे. माझ्या एका मित्राचं पुस्तक जाळून टाकण्यात आलं. पण तुम्हाला एखादं पुस्तक पसंत नसेल म्हणून जाळून टाकणं, बंदी आणणं हे योग्य नाही. चपखल उत्तर देण्यासाठी हवं तर दुसरी बाजू मांडणारं पुस्तक लिहावं”.

“साहित्य प्रफुल्लित ठेवायचं असेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवलं पाहिजे. पण जेव्हा सत्तेला माज चढतो तेव्हा निर्बंध लादले जातात. एकाधिकारशाही बळकट करताना फॅसिझमला खतपाणी मिळतं. अशावेळी साहित्यकार हात बांधून शांत बसू शकतात का?,” अशी विचारणा यावेळी त्यांनी केली.

“सत्तेपुढे नांगी टाकणारे आपल्याकडे फारजण आहेत ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांची प्रतिभा कुठे गवत खाते माहिती नाही. साहित्यिकांमध्ये सत्तेत येतो त्यांच्यासाठी चिअर करणारे चिअर लीडर्स तयार झालेत ही फार दुर्दैवी बाब आहे,” अशी खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. विद्रोही, बंडखोर लेखक तयार झाले पाहिजेत असंही यावेळी ते म्हणाले.

शरद पवार यांनी यावेळी बोलताना प्रोपागंडा साहित्य निर्मितीमुळे निरंकुशतेला निमंत्रण मिळत असून आपल्या देशात असाच विशिष्ट प्रोपागंडा पद्धतशीर पसरवला जात असल्याचं म्हटलं.

“राज्यकर्त्यांनी यासाठी साहित्य आणि माध्यमांची कमकुवत अंगे न्याहाळली आहेत. प्रसारमाध्यमांच्या बाबतीत त्यांनी अत्यंत हुशारीने कॉर्पोरेट जगाची मदत घेतली आहे. चित्रपट क्षेत्रातही त्याचा शिरकाव झाला आहे. हाच कॉर्पोरेटीकरणाचा प्रयोग आता साहित्यात होत आहे. तोट्यात असलेल्या प्रकाशन संस्था त्यांनी ताब्यात घेतल्या आहेत. हे असेच सुरु राहिले तर चौथा स्तंभ कोसळण्यास वेळ लागणार नाही. हे टाळायचे असेल तर साहित्यिकांना डोळ्यात तेल घालून दक्ष रहावे लागेल,” असं शरद पवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dnyanpith winner damodar mavjo akhil bhartiya marathi sahitya sammelan sgy
First published on: 22-04-2022 at 15:25 IST