Nitesh Rane challenge to MNS: मीरा रोड येथील दुकानदाराने मराठी बोलण्यास नकार दिल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी सदर व्यक्तीस मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेचे पडसाद विधीमंडळ अधिवेशनातही उमटले. भाजपाचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी या घटनेवर टीका करत मनसेला लक्ष्य केले. मनसेकडून गरीब हिंदूंनाच मारहाण केली जाते, असा आरोप करत त्यांनी प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेता आमिर खान यांचा उल्लेख केला.

मिरा रोड येथे मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या दुकानदाराला मनसे पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना नुकताच घडली होती. या प्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, मराठी सक्तीवरून झालेल्या या मारहाणीच्या निषेधार्थ व्यापारी संघटनांनी आंदोलन पुकारले असून गुरुवारी शहरातील बहुतांश भागांत दुकाने बंद ठेवण्यात आली होती. यानंतर मनसेनेही याविरोधात भूमिका घेतल्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले.

नितेश राणे काय म्हणाले?

आज विधीमंडळ आवारात माध्यमांशी बोलत असताना नितेश राणे म्हणाले, “मराठी बोलता येत नाही म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका हिंदूलाच मारले. त्यांच्यात एवढीच हिंमत असेल तर त्यांनी नळबाजार आणि मोहम्मद अली रोडवर जाऊन ती दाखवावी. दाढीवाले आणि गोल टोपी घालणारे लोक मराठीत बोलतात का? तिकडे जाऊन त्यांना प्रश्न विचारण्याची मनसेची हिंमत नाही.”

जावेद अख्तर, आमिर खान मराठीत बोलतात का?

“जावेद अख्तर, आमिर खान मराठीत बोलतात का? त्यांच्याकडून मराठी वदवून घेण्याची यांची हिंमत नाही. फक्त गरीब हिंदूंना का मारत आहात? हे सरकार हिंदूंचे आहे, हिंदुत्वाच्या विचारांवर चालणारे सरकार आहे. जर हिंदूंना मारण्याचा प्रयत्न कराल तर आमचे सरकार तिसरा डोळा उघडेल”, असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमिर खानला खरंच मराठी येतं का?

दरम्यान अभिनेता आमिर खान याने मराठी भाषेबद्दलचे त्याचे प्रेम अनेकदा जाहीर कार्यक्रमांमधून व्यक्त केलेले आहे. मराठी शिकण्यासाठी त्याने खासगी शिकवणी लावल्याचेही एकदा म्हटले होते. तसेच अनेक कार्यक्रमांमधून त्याने मराठीतून भाषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर उपलब्ध आहेत.