अमरावती : करोना संकटामुळे आर्थिक अडचणीत असल्याचे सांगून एका महिलेने येथील एका निवृत्त डॉक्टरकडे पैशांची मागणी केली. या महिलेने या डॉक्टरच्या एका चित्रपटात काम करण्यास होकार दिला होता. त्यामुळे त्यांनी मदतीच्या भावनेतून तिला सहकार्य केले. मात्र आरोपी महिलेने त्यांची तब्बल ७ लाख ७९ हजार रुपयांनी फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी डॉक्टरने दिलेल्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी शुक्रवारी अज्ञात मोबाइलधारक महिलेविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येथील  गणेशनगरमध्ये राहणारे एक ५८ वर्षीय डॉक्टर काही महिन्यांपूर्वीच वैद्यकीय अधिकारी पदावरून निवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर महिलांवरील अत्याचाराविरुद्ध ‘निशस्त्र’ नावाचा चित्रपट त्यांनी तयार करण्याचे ठरवले. या चित्रपटात कलाकार म्हणून परिचितांनाच ते संधी देणार होते, मात्र चित्रपटात एक दृश्य महिला अत्याचाराचे दाखवायचे असल्यामुळे ते यासाठी एका महिला कलाकाराच्या शोधात होते. गेल्या मे महिन्यात त्यांचा या दृश्यासाठी समाज माध्यमावरून एका महिलेसोबत संपर्क झाला. त्या अपरिचित महिलेने निवृत्त डॉक्टरला त्यांच्या चित्रपटात भूमिका साकार करण्यासाठी होकार दिला. दरम्यान, त्यानंतर महिलेने डॉक्टरसोबत मोबाइलवरून संपर्क साधला. मला करोना संकटामुळे आर्थिक अडचण येत आहे, तसेही तुम्ही चित्रपटात काम केल्यानंतर मला रक्कम देणारच आहे. असे सांगून आर्थिक मदत मागितली. डॉक्टरने या महिलेला गेल्या मागील पाच महिन्यात वेळोवेळी ऑनलाइन आर्थिक मदत पाठवली. सुमारे ७ लाख ७९ हजार ७७ रुपये या अनोळखी महिलेला दिले आहेत. ही महिला आपली फसवणूक करत असल्याचे लक्षात येताच निवृत्त डॉक्टरने शुक्रवारी सायबर पोलीस ठाणे गाठून हा प्रकार पोलिसांना सांगितला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात मोबाइलधारक महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doctor cheated for rs 7 lakh in the name of corona zws
First published on: 27-09-2020 at 02:24 IST