Jitendra Awhad on The Kerala Story controversy : गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन आणि राजकीय विश्वात सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाची बरीच चर्चा आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. काँग्रेससह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची युवा शाखा DYFI आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) च्या युथ लीगने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली होती. चित्रपटाची कथा चार महिलांची आहे, ज्यांना मुस्लिम धर्मात परिवर्तन करून दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील केले जाते. दरम्यान, पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. परंतु, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी चित्रपटाचं ना न घेता या टीका केली आहे. तसंच, एका मुस्लिम जोडप्याचं उदाहरण देत यावर चित्रपट काढण्याची तुमच्यात क्षमता आहे का? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
हेही वाचा >> “जागे व्हा, आपल्या ह्या हिंदू धर्माला…” शरद पोंक्षे यांची ‘द केरला स्टोरी’बद्दल मोठी प्रतिक्रिया
जितेंद्र आव्हाड ट्वीटमध्ये म्हणतात की, “केरळमधील कासरगोड येथील अब्दुल्ला आणि त्याची पत्नी खदिजा यांनी 10 वर्षांच्या हिंदू मुलीला दत्तक घेतले, जिने तिचे पालक गमावले होते, ती आता 22 वर्षांची आहे.अब्दुल्ला आणि त्याची पत्नी खदिजा यांनी तिचे लग्न एका हिंदू मुलाशी पूर्ण हिंदू विधींनी लावून दिले.यावर चित्रपट काढण्याची क्षमता तुमच्यात आहे का?नकारात्मक गोष्टी फक्त दाखवायचा प्रयत्न चालू आहे…देशात जातीय दंगली कशा घडवता येतील हा प्रयत्न 100% चालू आहे…” यावेळी त्यांनी या कुटुंबीयाचा फोटोही ट्वीट केला आहे.
मोदींनी केले चित्रपटाचे समर्थन
‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच वाद सुरू झाला आहे. केरळ सरकारने या चित्रपटाला संघ आणि भाजपाचा प्रोपगंडा करणारा म्हटलं आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून काँग्रेसकडूनही सातत्याने प्रतिक्रिया येत आहेत. या चित्रपटावरून वाद सुरू असताना भाजपाकडून सातत्याने या चित्रपटाचं आणि त्यात दाखवलेल्या घटनांचं समर्थन केलं जात आहे. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या चित्रपटावर बोलले आहेत. नरेंद्र मोदी सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. बेल्लारी येथील प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी द केरला स्टोरी या चित्रपटाचा उल्लेख करत काँग्रेसवर हल्लाबोल केला.