श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या ‘लोकसत्ता’ वक्तृत्व स्पर्धेच्या नगर विभागीय अंतिम फेरीत मुलींनीच एकहाती बाजी मारली. पहिली तिन्ही पारितोषिके मुलींनी जिंकली. राहुरी येथील त्यातही महात्मा फुले कृषी विद्यापीठाने या स्पर्धेत वर्चस्व राखले. पहिली दोन्ही बक्षिसे येथील विद्यार्थिनींनी जिंकली.
कविता देवढे हिने या स्पर्धेत पहिल्या क्रमांकासह मानाचा ‘स्पीकर’ जिंकला. मुंबई येथे होणाऱ्या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीसाठी प्रियंका वाईकर (द्वितीय) आणि अर्चना आव्हाड (तृतीय, विश्वभारती अभियांत्रिकी कॉलेज, नगर) यांनी ही बक्षिसे जिंकली.
हिवाळे शिक्षण संस्थेच्या आयएमएसमध्ये बुधवारी स्पर्धेतील नगर विभागीय अंतिम फेरी उत्साहात पार पडली. या फेरीला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आयएमएसचे सभागृह जाणत्या श्रोत्यांनी गच्च भरले होते. विशेष म्हणजे त्यात युवकांसह ज्येष्ठ नागरिकांची संख्याही मोठी होती.
‘ओबामा आले, पुढे काय?’ या विषयावर मांडणी केलेली कविता देवढे ही या विभागीय अंतिम फेरीत विजेती ठरली. स्पीकरच्या आकर्षक चषकासह पाच हजार रुपये व प्रमाणपत्र तिने पटकावले. प्रियंका वाईकर हिला द्वितीय क्रमांकाचे तीन हजार रुपये व प्रमाणपत्र आणि अर्चना आव्हाड हिला दोन हजार रुपये व प्रणाणपत्र असे पारितोषिक मिळाले. ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ समीरण वाळवेकर, ज्येष्ठ पत्रकार डॉ. गोपाळराव मिरीकर आणि नगर आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी मुजम्मील पटेल यांनी या विभागीय अंतिम फेरीचे परीक्षण केले.
नाथे समूह प्रस्तुत व पृथ्वी एडिफाइड्सच्या सहकार्याने ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्ृतत्व स्पर्धेच्या नगर विभागीय केंद्रावर बुधवारी अंतिम फेरी रंगली. आयुर्विमा महामंडळ, जनकल्याण बँक आणि तन्वी हर्बल यांचेही सहकार्य या स्पर्धेला लाभले आहे. नगर विभागाच्या प्राथमिक फेरीत २९ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातील सहा स्पर्धक अंतिम फेरीला पात्र ठरले होते. या फेरीसाठी त्यांना वेगळे विषय देण्यात आले होते.
स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषिक वितरण आयएमएमचे संचालक डॉ. एस. बी. कोलते व परीक्षकांच्या हस्ते झाले. ‘लोकसत्ता’चे नगरचे ब्युरो चीफ महेंद्र कुलकर्णी, मुख्य वितरण व्यवस्थापक मुकुंद कानिटकर, सहायक व्यवस्थापक संतोष बडवे या वेळी उपस्थित होते. डॉ. कोलते यांनी या वेळी या उपक्रमाचे कौतुक केले. वक्तृत्व ही कौशल्याची गोष्ट असून ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या या वैभवशाली परंपरेला निश्चित नवा आयाम मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉ. गोपाळराव मिरीकर यांनी स्पर्धेची समीक्षा केली. उद्धव काळापहाड यांनी सूत्रसंचालन केले.
आशय हाच खरा राजा- वाळवेकर
स्पर्धेनंतर ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ समीरण वाळवेकर यांचे व्याख्यान झाले. वक्तृत्व हे संवादाचे उत्तम माध्याम आहे, असे सांगून ते म्हणाले, मुख्यत्वे पाठांतर टाळले पाहिजे. अलीकडच्या काळात चांगल्या वक्तृत्वाची उदाहरणे तशी कमी आहेत. मात्र यात आशय हाच सगळय़ात महत्त्वाचा असून माध्यमे कितीही आधुनिक झाली तरी आशयाशिवाय तंत्रज्ञानाला अर्थ नाही. आशय हाच वक्तृत्वाचा खरा राजा आहे. त्याला भावमुद्रा, सादरीकरण याची योग्य जोड देणे गरजेचे आहे. देशात सध्या विविध प्रकारच्या ६५० वाहिन्या कार्यरत आहेत. येत्या वर्षभरात ही संख्या सातशेवर जाईल. यातील निवेदकाला कदापि मरण नाही, त्यामुळे करीअर म्हणूनही वक्तृत्वाला महत्त्व आहे, असे ते म्हणाले.