माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या मोहोळ तालुक्यातील वाघोली येथील महात्मा फुले मागासवर्गीय शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या पंचवार्षिक निवडणुकीत १७ पैकी १५ जागा जिंकून प्रा. ढोबळे गटाने आपले वर्चस्व कायम ठेवले. तर त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांच्या गटाला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. मोहोळ तालुक्यातील मंगळवेढा रस्त्यावर वाघोली येथील माळरानावर महात्मा फुले मागासवर्गीय शेतकरी सहकारी सूतगिरणीची उभारणी २५ वर्षांपूर्वी प्रा. ढोबळे यांनी केली होती. या सूतगिरणीचे वैशिष्टय़ म्हणजे सुरूवातीपासून अनेक संकटे झेलत, प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत या सूतगिरणीची वाटचाल सुरू आहे. सध्या एकूण वस्त्रोद्योगच संकटात असताना राज्यात अवघ्या चार सूतगिरण्या कशाबशा सुरू आहेत. यात वाघोलीच्या म. फुले मागासवर्गीय सूतगिरणीचा समावेश आहे.
मंगळवेढा राखीव विधानसभा मतदारसंघातून अनेक वर्षे विधानसभेवर प्रतिनिधित्व करणारे प्रा. ढोबळे कालपर्यत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निष्ठावंत पाईक समजले जात असत. मागील २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत मंगळवेढय़ाऐवजी शेजारचा मोहोळ मतदारसंघ राखीव झाला असता खास पवार यांच्या आग्रहास्तव मोहोळच्या मतदारांनी प्रा. ढोबळे यांना निवडून दिले. राज्याच्या मंत्रिमंडळात काही वर्षे मंत्रिपद सांभाळणारे प्रा. ढोबळे यांच्यावर अलीकडे पवार यांची खप्पामर्जी झाली. त्यामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट कापून त्यांचेच शिष्य असलेले रमेश कदम यांना राष्ट्रवादीकडून संधी मिळाली. त्यामुळे प्रा. ढोबळे यांनी बंडखोरी करून स्वत:ची अपक्ष उमेदवारी आणली. परंतु त्यांना दारूण निराशा पत्करावी लागली. आमदार रमेश कदम यांनी प्रा. ढोबळे यांचे उरले-सुरले वर्चस्व संपविण्याचा विडा उचलला. त्यातूनच महात्मा फुले सूतगिरणीची निवडणूक लागली. यात आमदार कदम यांनी प्रा. ढोबळे यांना थेट आव्हान दिले.
प्रा. ढोबळे व आमदार कदम या दोघांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. दोघांनी एकमेकांच्या विरोधात जाहिरातबाजीद्वारे प्रचारयुध्द केले. १७ जागांपैकी १२ जागा बिनविरोध निवडल्या गेल्या. यात प्रा. ढोबळे गटाला १०, तर आमदार कदम यांच्या गटाला २ जागा मिळाल्या. उर्वरित ७ जागांसाठी निवडणूक मतदान झाले. यातही प्रा. ढोबळे यांनी बाजी मारत सर्व ७ जागा जिंकून घेतल्या. निकाल जाहीर झाल्यानंतर प्रा. ढोबळे समर्थकांनी जल्लोष केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dominant of dhoble group on phule backward thread mills
First published on: 02-04-2015 at 03:15 IST