पंढरपूरमध्ये ५६ गाढवांना चक्क अटक करून कोंडवाडय़ात ठेवण्यात आले आहे, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले आणि पुढे सभागृहात ‘गर्दभपुराण’ चांगलेच रंगले. उभय बाकांवरील सदस्यांच्या प्रश्नांच्या फैरी आणि त्याला खडसे यांची सडेतोड उत्तरे सुरू झाल्यावर हास्याचे फवारे उडाले. ‘गाढवांच्या मालकांचा शोध सरकार घेत आहे, पण कोणीच त्यांच्यावर दावा सांगण्यासाठी पुढे येत नाही,’ असे खडसे यांनी सांगताच सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.
पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीच्या पात्रात चोरटय़ा वाळूचा उपसा केला जातो, या विषयावर सभागृहात लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती. त्यावर या तस्करांवर कारवाई करण्यात आली असून गाढवांच्या पाठीवरील वाळूच्या गोण्या जप्त करण्यात आल्या आहेत. ‘या तस्करीतील ५६ गाढवांनाही अटक करण्यात आली आहे,’ असे खडसे यांनी सभागृहात सांगितले. त्यावर ‘कोटय़धीश’ दिलीप सोपल उठले आणि त्यांनी गाढवांची योग्य काळजी घेण्याची सूचना केली. ‘त्या बिचाऱ्या गाढवांना काय माहीत की आपल्या पाठीवरील गोण्यांमध्ये सोने आहे की तस्करीची वाळू?.. सरकारी कोंडवाडय़ांची अवस्था पाहता पाहुणचार घेणाऱ्या गाढवांची हेळसांड होऊ नये, त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे त्यांनी सुचविले.
त्याला तेवढय़ाच मिश्कीलपणे खडसे यांनी उत्तर दिले. कोंडवाडय़ात योग्य सुविधा पुरविण्यात आल्या असून गाढवांच्या तब्येतीची रोज तपासणी करण्यात येत आहे. त्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. कोणीही त्यांच्यावर मालकी सांगण्यासाठी पुढे येत नसले तरी गाढवांच्या मालकांचा शोध घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे खडसे यांनी सांगितल्यावर सभागृहात हास्यकल्लोळ झाला.