नांदेड : काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या कर्मभूमीत, त्यांचे राजकीय शिष्य व माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जयंतीदिनी नांदेडसह मराठवाड्यातील काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पाडण्याचा याच पक्षाच्या माध्यमातून दीर्घकाळ सत्तेत राहिलेल्या अशोक चव्हाण यांचा प्रयत्न केवळ चार जणांपुरताच मर्यादित राहिला. त्यात एक भर म्हणून काँग्रेसचे माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत यांनी भाजपामध्ये फेरप्रवेश केल्याचे दिसले.
अशोक चव्हाण यांनी सव्वा वर्षापूर्वी भाजपामध्ये प्रवेश घेतल्यानंतर जिल्ह्यातील त्यांचे अनेक समर्थक भाजपावासी झाले. पण नंतरच्या काळात विशेषतः राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या तुलनेत चव्हाण यांना आपला करिश्मा दाखवता आला नाही. त्याआधी लोकसभा निवडणूक आणि नंतरच्या पोटनिवडणुकीतही ते भाजपाला यश मिळवून देऊ शकले नव्हते.
भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षातर्फे मोठा कार्यक्रम घडवून आणण्यात चव्हाण यांनी पुढाकार घेतला नव्हता. पण काही आठवड्यांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना नांदेडचे निमंत्रण देऊन त्यांनी त्यांच्या कार्यक्रमांची आखणी करताना काँग्रेस पक्षात राहिलेल्या आपल्या जुन्या समर्थकांना भाजपात आणण्यासाठी चाचपणी चालवली होती.
शहा यांच्या नांदेडची २६ मे ही तारीख असल्याची माहिती प्रशासनाकडे आल्यानंतर याच तारखेला चव्हाणांच्या आमदारकन्येचा वाढदिवस असल्याचे दिसून आले. तसेच २६ मे रोजी विलासराव देशमुख यांची जयंती असल्याचेही लक्षात आले, पण या तारखेला काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पाडण्याचा चव्हाण यांचा प्रयत्न त्यांच्या राजकीय प्रभावाच्या तुलनेत लक्षणीय ठरला नाही.
खासदार चव्हाण यांचे मेव्हणे, माजी खासदार व आमदार भास्करराव खतगावकर, चव्हाणांचे पुतणे उदय चव्हाण हे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. त्याशिवाय काँग्रेसचे अन्य तीन माजी आमदारही ‘राष्ट्रवादी’त गेले. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसमध्ये असलेले तीन माजी आमदार चव्हाण यांच्या माध्यमातून भाजपात जातात का, याकडे सबंध जिल्ह्याचे लक्ष लागले होते; पण त्यांच्यापैकी कोणीही भाजपात जाण्यात स्वारस्य दाखविले नाही.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या काँग्रेस पक्ष संघटनेचे अर्धे अध्यक्ष बी.आर. कदम, त्यांचे पुत्र विश्वास यांनी मात्र चव्हाण यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. माजी आमदार माधवराव जवळगावकर यांनी भाजपात यावे, यासाठी चव्हाण उत्सुक होते; पण जवळगावकर यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. वयाने ज्येष्ठ असलेले माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांनी आपण हयात असेपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार, असे स्पष्ट केले तर हणमंतराव बेटमोगरेकर यांनी तर ‘काँग्रेस म्हणू ; काँग्रेसच आणू !’ अशी भूमिका घेतली आहे.
काँग्रेसचे माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत यांना सहा महिन्यांपूर्वी चव्हाण परिवाराने भाजपाचे उपरणे टाकले होते. तेव्हापासून ते राजकीयदृष्ट्या अलिप्त होते, तरी आपण भाजपात प्रवेश केला असे त्यांनी नुकतेच जाहीर केले होते. सोमवारी त्यांनी पुन्हा प्रदेशाध्यक्षांचे हस्ते उपरणे गळ्यात घालून घेतले. बी.आर. कदम, त्यांचे पुत्र विश्वास तसेच डॉ. अंकुश देवसरकर आणि कुंडलवाडीचे माजी नगराध्यक्ष शैलेश राकावार यांचा प्रवेश घाईघाईमध्ये उरकण्यात आला. देवसरकरही आधी भाजपात होते. मध्यंतरी शिवसेनेत गेले. आता पुन्हा स्वगृही परतले.