सध्या सोशल मीडियावर एक बॅनर व्हायरल होत आहे. नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील काही तरुणांना हनुमान जयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी नागपुरात एक बॅनर लावला होता. संबंधित बॅनरवर भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळेंचा फोटो सर्वात वरच्या बाजुला लावला होता. तर चंद्रशेखर बावनकुळेंच्या फोटोच्या खाली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तीन फोटो लावण्यात आले आहेत.

हा बॅनर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीकास्र सोडलं आहे. “हा काय घाणेरडा प्रकार आहे. बावनकुळेसाहेब, तुम्ही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहात, तुम्हाला हे पोस्टर मान्य आहे का?” असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी विचारला.

हेही वाचा- “नरडं दाबून त्यांना कायमचं…”, रॅपर उमेश खाडेला ताब्यात घेतल्यानंतर आव्हाडांची प्रतिक्रिया

नेमकं प्रकरण काय आहे?

नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील रहिवाशी मेघराज बेलेकर यांच्या घरावर हा बॅनर लावण्यात आला होता. हा बॅनर लावल्यानंतर अवघ्या काही वेळात हा बॅनर सोशल मीडियावर व्हायरल झाला असून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपावर टीकेची झोड उठवण्यात आली. या प्रकारानंतर बॅनरबाजी करणाऱ्या तरुणांनी जाहीर माफी मागितली आहे. तसेच संबंधित बॅनरशी भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा काहीही संबंध नाही, असं स्पष्टीकरण बॅनर लावणाऱ्यांनी दिलं आहे.

हेही वाचा- “आधी पक्षाचं नाव नीट घ्या, मग…”, श्रीकांत शिंदे पत्रकारावर भडकले, VIDEO व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा बॅनर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं लक्षात येताच हा बॅनर काढला आहे. शिवाय बॅनरबाजी करणाऱ्या पाच जणांनी जाहीर माफीनामा लिहून चूक मान्य केली आहे. आमच्याकडून चूक झाली असून आम्ही सर्व सदस्यांसह माफी मागतो, असा माफीनामा त्यांनी जाहीर केला आहे. चूक लक्षात आल्यानंतर संबंधित कार्यकर्त्यांनी लेखी माफी मागितली. तसेच माफीचे बोर्डही लावले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या सर्वांसाठी वंदनीय आहेत. आपण विकासाची कामं करुया…, असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यलयाकडून करण्यात आलं.