नीलेश पवार, नंदुरबार

नंदुरबार

काँग्रेस किंवा गांधी कुटुंबीयांचा पारंपरिक बालेकिल्ला असलेला नंदुरबार मतदारसंघ गेल्या वेळी भाजपने काँग्रेसकडून पटकविला होता. हा मतदारसंघ कायम ठेवण्याकरिता भाजपची धडपड सुरू असली तरी गटातटाच्या राजकारणाचा विद्यमान खासदार हिना गावित यांना फटका बसला आहे. दुसरीकडे, काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जागावाटपात सर्वाधिक रस्सीखेच होणारा मतदारसंघ म्हणून नंदुरबारकडे पाहिले जात आहे. भाजपमध्ये असलेल्या डॉ. विजयकुमार गावितांच्या राष्ट्रवादी परतीच्या चर्चेने नंदुरबार मतदार संघात अनिश्चितचे सावट पसरले आहे.

स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला नंदुरबार मतदारसंघ गेल्या निवडणुकीत प्रथमच भाजपने डॉ. हिना गावितांच्या माध्यमातून काबीज केला. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या डॉ. गावितांच्या वर्चस्वाचा फायदा घेत भाजपने आदिवासीबहुल मतदारसंघात कमळ फुलवले. त्यानंतर भाजपमध्ये निष्ठावंत आणि उपरे अशी पडलेली दुफळी अद्याप भरून निघालेली नाही. नऊ वेळा लोकसभेत पोहचलेले माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचा २०१४च्या निवडणुकीत एक लाखहून अधिक मतांनी झालेला पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागला. इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत जाहीर सभांना सुरूवात केली, तो हा नंदुरबार जिल्हा.

खासदारकीच्या कार्यकाळात डॉ. हिना गावित यांनी रेल्वे दुहेरीकरणाच्या कामाला अधिकचा निधी आणण्यासाठी प्रयत्न करीत नंदुरबार-सूरत रेल्वे मार्गाच्या कामाला गती दिली. जिल्ह्य़ातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणासाठी कोटय़वधींचा निधी आणला. केंद्राने सुरू केलेल्या उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून जिल्ह्य़ात दीड लाख गॅस जोडणीचे वाटप करत अडीच वर्षांनंतर डॉ. हिना गावितांनी दुर्गम भागातील घराघरात पोहोचण्याची धडपड केली. ‘हर घर बिजली’ अभियानातून जवळपास एक लाखाहून अधिक घरांना स्वातंत्र्यानंतरची पहिली वीज जोडणी. केंद्रीय विद्यालय, एकलव्य विद्यालयांना मंजुरी आदी विकासकामे ही हिना गावित यांची जमेची बाजू. सातपुडा पर्वतराजीत वसलेल्या मतदारसंघात आरोग्य, दूरसंचार क्षेत्र, पंतप्रधान ग्रामीण सडक योजना, बँकांसंबंधीच्या समस्या आणि आदिवासी विकास विभागाकडून जिल्ह्य़ाकडे झालेले दुर्लक्ष यावर खासदारांना मार्ग काढता आलेला नाही. खासदारांनी दत्तक घेतलेल्या कहांटूळ गावाचा विकास झालेला नाही. गावातील भाजप कार्यकर्त्यांची गटबाजी त्यास कारणीभूत ठरली. खासदार दत्तक गावाचा कायापालट करण्याची पंतप्रधानांची महत्त्वाकांक्षी योजना मतदारसंघात अडचणीत सापडली.

भाजपमधील गटबाजी टोकाला

साडेचार वर्षांत भाजपमधील अंतर्गत गटबाजी वारंवार उफाळून आली. डॉ. गावित गटाला होणारा विरोध आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नाराजी हे मुद्दे खासदारांसाठी तापदायक ठरले. परंतु त्या वगळता भाजपकडे सक्षम पर्याय नाही. दुसरीकडे जिल्हा परिषदेवर वर्चस्व मिळवत काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

या मतदारसंघात नंदुरबारसह धुळे जिल्ह्य़ातील शिरपूर आणि साक्रीसारख्या आदिवासीबहुल तालुक्याचा समावेश आहे. प्रत्येक तालुक्यातील काँग्रेस नेत्यांनी आगामी धोका ओळखत आपापला तालुका मजबुतीला प्राधान्य दिले आहे. माणिकराव गावित यांचे वाढते वय बघता काँग्रेस नव्या उमदेवाराची चाचपणी करत आहे. राष्ट्रवादीने मतदारसंघासाठी आग्रह धरल्याने गोंधळाची स्थिती आहे.

विधानसभेतील राजकीय चित्र

’नंदुरबार- भाजप

’नवापूर- काँग्रेस

’शहादा- भाजप

’अक्राणी- काँग्रेस

’साक्री- काँग्रेस

’शिरपूर- काँग्रेस

देशात सर्वाधिक मागास आणि विकासापासून वंचित राहिलेला जिल्हा म्हणून नंदुरबारची ओळख होती. या मतदारसंघात विकासकामांच्या माध्यमातून ही ओळख पुसत विकासात्मक जिल्हा म्हणून नंदुरबारला नावारूपाला आणले. उज्ज्वला योजनेतून सुमारे दीड लाख जोडण्या, महामार्ग विकासासाठी १२५० कोटींचा निधी, स्वातंत्र्यानंतर दुर्गम भागात पहिल्यांदाच पोहोचलेली वीज, रस्ते, भ्रमणध्वनीचे ७० मनोरे ही आपल्या कामांची पावती आहे.

– डॉ. हिना गावित (खासदार तथा जिल्हाध्यक्ष, भाजप)

भाजपने जनतेची दिशाभूल करत सत्ता काबीज केली. मात्र ‘जुने तेच सोने’ याची प्रचीती आता जनतेला आली असून जनसामान्य काँग्रेसच्या पाठीमागे आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या आणि पूर्ण झालेल्या कामांचे श्रेय भाजप खासदार घेत आहेत. खासदारांनी दत्तक घेतलेल्या गावात शुद्ध पाण्यासाठी लोकांना बळी द्यावा लागल्याचे चित्र समोर आले. युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन ही निव्वळ वल्गना ठरली.  – आमदार चंद्रकात रघुवंशी (जिल्हाध्यक्ष, काँग्रेस)

काँग्रेस पहिल्यादांच पराभूत

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर नंदुरबार आणि सांगली या दोनच मतदारसंघांत कायम काँग्रेसने विजय संपादन केले होते. १९८१ पासून (लोकसभा पोटनिवडणूक) ते २०१४ पर्यंत लागोपाठ नऊ वेळा माजी गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांनी नंदुरबार मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. २००९च्या निवडणुकीनंतर गावित यांची सदस्यांच्या शपथविधीसाठी हंगामी लोकसभा अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. इंदिरा गांधी या नेहमीच प्रचाराची सुरुवात नंदुरबारपासून करीत. सोनिया गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यावर पहिली जाहीर सभा नंदुरबार जिल्ह्य़ातच झाली होती. यूपीए-२च्या काळात आधारची सुरुवात ही नंदुरबार जिल्ह्यातून तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत झाली होती. मात्र मोदी लाटेत नंदुरबारचा गड काँग्रेसला कायम राखता आला नाही.