कोल्हापूर : तळागाळातील वंचित, शोषित समाजाला सत्तेच्या मार्गातून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराज यांनी देशाला दिला आहे. विविध धर्म, भाषा, संस्कृती आणि सामाजिक मूल्ये जपण्याचे कार्य करून देवत्वाच्याही पलीकडे जाणारा राजा म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज होते. त्यांची समतेची शिकवण आत्मसात करून माणुसकी जपा, असे प्रतिपादन ज्येष्ठ नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी केले.
राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने यंदाचा ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ डॉ. पटेल यांना खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते एक लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र अशा स्वरूपातील पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, शाहूप्रेमी उपस्थित होते. डॉ. अशोक चौसाळकर यांनी पटेल यांचा परिचय करून दिला. शाहू महाराजांनी दिलेला समतेचा विचार डॉ. पटेल यांनी चित्रपटांच्या माध्यमातून रुजवला. कलेच्या माध्यमातून राज्याला नवी दिशा देण्याचे काम त्यांनी केले असल्याचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी सांगितले.
शाहू स्मारकाचे नूतनीकरण – आबिटकर
शाहू महाराज प्रत्येकाच्या मनात आणि हृदयात आहेत. त्यांचे विचार आणि त्यांचे कार्य सर्वदूर पोहोचवण्याच्या दृष्टीने शाहू स्मारकाच्या नूतनीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून पाच कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा अध्यक्षीय भाषणात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली.
शाहूप्रेमींचे सहकार्य अपेक्षित – जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, शाहू महाराजांच्या कार्याचा प्रसार करण्याचे काम शाहू स्मारक ट्रस्ट करत असून, या वास्तूचे नूतनीकरण व आधुनिकीकरण करून नवनवीन उपक्रमांच्या माध्यमातून त्यांचे कार्य जगभरात पोहोचवण्यात येणार आहे. यासाठी शाहूप्रेमींनी योगदान द्यावे, असे आवाहन केले. मोहिनी चव्हाण यांनी मानपत्राचे वाचन केले. राजदीप सुर्वे यांनी आभार मानले.