राहाता : बदलत्या काळात राजसत्ता ही धर्मसत्तेकडे जाताना दिसत असल्याने साहित्यिकांनी राजसत्तेचा दरारा टिकवण्यासाठी प्रयत्न करावे. सर्वच क्षेत्रांत अपप्रवृत्ती शिरल्या तशाच त्या सहकार क्षेत्रात घुसल्याने सहकार क्षेत्राची नकारात्मक चर्चा साहित्य क्षेत्रात झाली आहे. सहकाराने समाज जीवनात सकारात्मक व अमुलाग्र बदल घडविल्याने नव्या पिढीतील लेखकांनी सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी यांनी व्यक्त करीत भाषेच्या उच्चारांचे भान राज्यकर्त्यांनी राखण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

पद्मश्री विखे पाटील यांच्या १२५ व्या जयंती दिनाच्या निमित्ताने आज, शुक्रवारी प्रवरानगर येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात आयोजित साहित्य व कला गौरव पुरस्काराचे वितरण जोशी यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोल खताळ, आमदार काशिनाथ दाते, डॉ. राजेंद्र विखे, डॉ. सुजय विखे, शालिनी विखे आदी उपस्थित होते.

डॉ. जोशी यांनी सांगितले की, सत्याचा शोध घेण्याचे काम लेखकांनी केले पाहिजे. सत्याला डाव्या व उजव्या बाजूचे सत्य नसते. रंग, मध्यम मार्ग सत्य नेहमी अल्पमतात असते. अशा सत्याचा जागर करण्याचे काम नवलेखकांनी करावे, लेखकांनी विचारधारेचे झेंडे खांद्यावर घेण्यापेक्षा सत्याचे झेंडे खांद्यावर घ्यावे, त्यासाठी लेखकांनी एकला चलो या भावनेतून पुढे गेले पाहिजे. समाजाने साहित्याभिमुख होण्याची गरज आहे. मोबाईल व दूरचित्रवाणीने सर्व हिरावून घेतल्याने घरातून वाङ्मयीन संस्कृती हद्दपार होताना दिसत आहे. वैचारिक साहित्यांची निर्मिती दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. समाजमन दुरुस्त करण्यासाठी साहित्यिकांत मोठी ताकद आहे. राजकारण्यांकडून सध्या व्यक्तिद्वेशापोटी भाषेच्या उच्चाराचे भान राखले जात नाही. तंत्रज्ञान व तत्त्वज्ञानातून ज्ञानेश्वरांचे पसायदान साकार होत असल्याचे जोशी यांनी सांगितले.

जीवनगौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी आपल्या भाषणात विखे पाटील परिवाराने राजसत्तेच्या सिंहासनावर असतानाही नम्रतेचा संस्कार जपला. याचे कारण पद्मश्री आणि डॉ. बाळसाहेब विखे पाटील यांची पुण्याई पुढे नेण्याचे काम या घराण्याकडून सुरू आहे. मी कोल्हापूरचा असल्याने या भागातील सहकारी संस्थांची झालेली दुरवस्था मी जवळून पाहत आहे. पण या परिसरातील एकही सहकारी संस्थानं खालसा झाले नाही. सहकार आणि साहित्य यांचे योग्य असे नाते या परिसराने जुळवून ठेवले आहे. अनेक साहित्य पुरस्कारांचे सोहळे राज्यात होतात. परंतु, येथे साहित्यीकांच्या सन्मानासाठी आख्खं गाव धावून येतं, हे या पुरस्काराचे वेगळेपण आहे.

स्वागत व प्रास्ताविक पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, तमाशा कलावंत शिरढोणकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

पुरस्कारप्राप्त मान्यवर

पुरस्काराचे यंदाचे हे ३५ वे वर्ष असून, या वर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील जीवनगौरव पुरस्कार कोल्हापूरचे साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांना, राज्यस्तरीय उत्कृष्ठ साहित्य पुरस्कार डॉ. मिनाक्षी पाटील, डॉ. एच. व्ही देशपांडे, नाट्यसेवा पुरस्कार दिलीप जगताप आणि कलागौरव पुरस्कार अंताबंर शिरढोणकर आणि प्रसाद अंतरवेलीकर यांना देवून गौरविण्यात आले. विशेष साहित्य पुरस्काराने एच. व्ही. देशपांडे, जिल्हा साहित्य पुरस्काराने संतोष भालेराव, जिल्हा विशेष साहित्य पुरस्काराने श्रीकांत कासट आणि प्रवरा परिसर विशेष साहित्य पुरस्काराने संदीप तपासे, वसंतराव ठोंबरे यांना देवून गौरविण्यात आले.

‘प्रवरे’ने साहित्य संमेलनाची सुपारी स्वीकारावी

जीवनगौरव पुरस्कारप्राप्त सुनीलकुमार लवटे यांनी सांगितले की, आम्ही कोल्हापूरचे असल्यामुळे सुपारी घेण्याची सवय आहे. प्रवरेच्या काठी साहित्याचा एवढा सन्मान होत असेल तर, सहकाराच्या भूमित मंत्री राधाकृष्ण विखे यांनी साहित्य संमेलन आयोजित करण्याची सुपारी स्वीकारावी.