डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा प्रेरणादायी उपक्रम

प्रबोध देशपांडे, अकोला</strong>

देशातील मोठय़ा नेत्यांपासून ते गल्लीबोळातील कार्यकर्त्यांपर्यंतचे छायाचित्र असलेले मोठमोठे फलक नेहमीच आपल्या नजरेस पडतात. अनेकवेळा हे अवैध फलक सर्वसामान्यांसाठी डोकेदुखीच ठरतात. अकोल्यात मात्र फलकांच्या माध्यमातून सकारात्मक संदेश देण्याचा प्रयोग करण्यात आला. कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या संकल्पनेतून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने पाच प्रयोगशील शेतकरी व त्यांच्या कार्याची माहिती चक्क फलकावर झळकवली आहे.

आदर्श शेतकऱ्यांच्या प्रयोगाची माहिती होऊन इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने कृषी विद्यापीठ हा प्रेरणादायी उपक्रम राबवत आहे.

प्रयोगशील शेतकऱ्यांच्या आदर्श शेतीची माहिती व्यापक प्रमाणात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे कृषी विद्यापीठाने पुढाकार घेऊन विदर्भातील पाच प्रयोगशील शेतकऱ्यांच्या छायाचित्रासह त्यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या वैशिष्टय़पूर्ण कामगिरीचे फलक झळकवले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाला लागून असलेल्या कृषी विद्यापीठाच्या दर्शनी भागात हे फलक लावण्यात आले आहेत. अकोला जिल्हय़ातील देऊळगाव येथील कांदा बिजोत्पादक शेतकरी नामदेव अढाऊ यांच्यासह पाच शेतकरी फलकावर झळकले आहेत. अढाऊ यांनी अद्ययावत विद्यापीठ तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला. त्यांनी १९९० मध्ये एक एकरापासून बिजोत्पादनाची सुरुवात केली. आज १० एकरावर ते दर्जेदार कांदा बिजोत्पादन घेत असून कांद्याचे एकरी २१० क्विंटल विक्रमी उत्पादन घेतात. त्यासाठी पाणी संवर्धन केले आहे. अढाऊ १५ ते १६ लाखांचे वार्षिक उत्पन्न घेतात. अमरावती जिल्हय़ातील म्हसाला येथील रवींद्र मेटकर शेती व कुक्कुटपालनाचा पूरक व्यवसाय करतात. १०० कोंबडय़ा घेऊन सुरू केलेल्या व्यवसायात आज दीड लाख अंडी देणाऱ्या कोंबडय़ांचे संगोपन होते. कोंबडय़ांच्या स्वयंचलित संगोपनगृहाची त्यांनी निर्मिती केली. ५० जणांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला. त्यांच्या व्यवसायाची उलाढाल ८० लाख ते एक कोटी आहे. अकोला जिल्हय़ातील चित्तलवाडी येथील विजय इंगळे ठिबक सिंचनाचा प्रभावी उपयोग करतात. विदर्भातील ठिबक सिंचनाचा पहिला प्रयोग त्यांनी सन २००० मध्ये ७० एकरावरील कापसावर केला. ठिबक सिंचनाच्या वापरामुळे निंदण खर्चात कपात झाली. स्वग्रामी ९० टक्के शेतकऱ्यांकडून अवलंब झाला. त्यामुळे ५० टक्के पाण्याची बचत होऊन खताची कार्यक्षमता वाढली. विजय इंगळेंच्या मागदर्शनात हजारो शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा अवलंब केला. बुलढाणा जिल्हय़ातील टाकरखेड (हेलगा) येथील पंढरीनाथ गुंजकर यांनी शेती अवजारे निर्मितीत मोठे यश मिळवले. ते शेतकऱ्यांना आवश्यकतेप्रमाणे कमी खर्चात यंत्र बनवून देतात. त्यांनी संपूर्ण शेतीचे यांत्रिकीकरण केले. पेरणी यंत्र, फवारणी यंत्र, बीज संस्करण यंत्रणा आदींची निर्मिती केली. सोबतच उत्कृष्ट गांडूळ खत निर्मितीसह सेंद्रिय शेती करतात. वाशीम जिल्हय़ातील चांभई येथील दिलीप फुके यांनी नियमित रुंद वरंबा व सरी पद्धतीचा संपूर्ण क्षेत्रावर वापर केला. त्यांनी दहा हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन २५ हजार एकरांवर त्याचा अवलंब करण्यात आला. त्यामुळे जल व मृद संधारण होऊन पाण्याचा निचरा होण्यास मदत होत आहे. या आदर्श शेतकऱ्यांच्या कार्यातून इतर शेतकऱ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळत आहे.

अनुभव व संकल्पनेतून शेती प्रयोग

शेतकरी आपल्या अनुभव व संकल्पनेतून शेतीमध्ये विविध प्रयोग करतात. त्यातून उत्पादन वाढीसह कृषी क्षेत्रातील समस्या व विविध प्रश्नांवर मात करण्याचा प्रयत्न असतो. कृषी विद्यापीठाचेही त्यांना मार्गदर्शन मिळते. पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत सतत धडपडणाऱ्या शेतकऱ्यांचे अनेक प्रयोग यशस्वी होतात. त्याची प्रेरणा इतर शेतकऱ्यांना मिळण्याच्या दृष्टीने विद्यापीठ हा विशेष उपक्रम राबवत आहे.

प्रतिभावंत शेतकऱ्यांच्या कार्याचा परिचय करून देण्याच्या दृष्टीने उपक्रम सुरू करण्यात आला. टप्प्याटप्प्याने विविध प्रयोगशील शेतकऱ्यांची माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. यातून प्रेरणा घेत युवा शेतकरी आपले अस्तित्व सिद्ध करतील.

– डॉ.विलास भाले, कुलगुरू, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.