वाई: रा. ना. गोडबोले ट्रस्ट तर्फे प्रदान केलेला सातारा भूषण पुरस्कार हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च बहुमान असल्याचे उदगार प्राज इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा व जगभरात इथेनॉल मॅन म्हणून प्रसिध्द असलेले डॉ. प्रमोद चौधरी यांनी काढले.रा. ना. गोडबोले (सार्वजनिक) ट्रस्‍ट व सातारकर नागरिकांच्या वतीने प्रतिवर्षी आपल्‍या उत्तुंग कर्तुत्‍वाने सातारा जिल्‍ह्याचे नांव उज्‍ज्‍वल करणार्‍या व्‍यक्‍तीला सातारा भूषण पुरस्‍काराने गौरवले जाते. २०२२ सालचा हा पुरस्‍कार प्रसिध्‍द प्राज इंडस्‍ट्रीजचे डॉ. प्रमोद चौधरी यांना प्रदान करण्‍यात आला. यावेळी डॉ. चौधरी बोलत होते. पुरस्कार विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे निंबाळकर यांचे शुभहस्ते व आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे अध्यक्षतेखाली, ट्रस्टचे विश्वस्त अरूण गोडबोले, डॉ. अच्युत गोडबोले, अशोक गोडबोले यांच्या उपस्थीतीत संपन्न झाला. रु. ३०,०००/- व सन्‍मानचिन्‍ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

यावेळी बोलताना डॉ. प्रमोद चौधरी म्हणाले की, हा सन्मान माझा नसून आज पर्यंतच्या माझ्या वाटचालीत मला सहकार्य करणाऱ्या सर्व स्टाफचा आहे. बायोफ्युएल निर्मिती बरोबरच येत्या काळात कचऱ्यापासून इंधन निर्मिती, फॉसिल्स इंधन निर्मिती व संपुर्ण जगाला प्लॅस्टीक कचऱ्यापासून सुटका करणाऱ्या बायो प्लॅस्टीक निर्मितीचा संकल्प केला असून सातारा भूषण सारख्या पुरस्कारांनी मला काम करण्याचे अधिक बळ मला मिळेल.आजपर्यंत अनेक मान सन्मान पुरस्कार मला मिळाले आहेत. पण आपल्याच मातीत आपल्या माणसांनी केलेला सन्मान हा सर्वात मोठा असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी डॉ. प्रमोद चौधरी यांनी पुरस्काराच्या रक्कमेत स्वतःची रक्कम वाढ करून सदरची रक्कम ही पर्यावरणासाठी कार्य करणाऱ्या संस्थेला मदत म्हणून देत असल्याचे जाहिर केले.

यावेळी बोलताना रामराजे निंबाळकर म्हणाले की, जगात अनेक उद्योजक पैसा मिळवण्याच्या उद्देशाने काम करीत असतात पण डॉ. प्रमोद चौधरी हे एक उत्कृष्ठ उद्योजक असून उत्कृष्ठ शास्त्रज्ञ व उत्कृष्ठ नागरिक आहेत. व्यवसायात काम करताना आपले काम समाजाला उपयोगी कसे होईल याचे उत्कृष्ठ उदाहरण म्हणजे डॉ. चौधरी आहेत. संपुर्ण जगाला बायोफ्युएल च्या माध्यमातून उपकारक ठरणाऱ्या पर्यावरण रक्षक व संवर्धन करणार्‍या डॉ. चौधरी यांचे कार्य असेच बहरत राहो अशा शुभेच्छा दिल्या. समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले की, डॉ. प्रमोद चौधरी यांच्या शोधामुळे साखर इंडस्ट्री, एव्हीएशन इंडस्ट्री , पर्यावरण व फ्युएल इंडस्ट्रीजला मोलाची मदत होणार असल्याचे मत व्यक्त केले. तसेच गोडबोले ट्रस्टच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी मान्यवरांचा सत्कार ट्रस्टच्या वतीन अरूण गोडबोले, डॉ. अच्युत गोडबोले व अशोक गोडबोले यांनी केला. गोडबोले ट्रस्टची माहिती डॉ. अच्युत गोडबोले यांनी विशद केली. सूत्रसंचलन व आभार प्रद्युम्न गोडबोले यांनी केले. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त उदयन गोडबोले , डॉ. चैतन्य गोडबोले, डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, प्रा. पुरूषोत्तम शेठ, प्रकाश गवळी, प्रकाश बडेकर, कराडचे बाळासाहेब कुलकर्णी, फलटण ब्राह्मण संघाचे पदाधिकारी, डॉ. संदीप श्रोत्री, डॉ. अविनाश लेले, श्रीराम नानल, विजय मांडके, बाबुराव शिंदे व अनेक मान्यवर उपस्थीत होते.