सोलापूर : ज्येष्ठ मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. शिरीष पद्माकर वळसंगकर (वय ७०) यांना असह्य मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटकेत असलेल्या त्यांच्याच रुग्णालयातील माजी प्रशासकीय अधिकारी मनीषा महेश माने-मुसळे (वय ४५) हिला सोलापूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. त्यामुळे तिची ६६ दिवसांनी तुरुंगातून सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
डॉ. वळसंगकर यांच्या एसपी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्स रुग्णालयात प्रशासकीय अधिकार म्हणून सेवेत असताना मनीषा मुसळे-माने हिने डॉ. वळसंगकर यांच्यावर खोटे आणि निराधार आरोप करून त्यांना प्रचंड मानसिक त्रास दिला होता. त्यामुळे वैतागून त्यांनी १८ एप्रिल २५ रोजी स्वतःच्या रिव्हाॅल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली होती. याप्रकरणी त्यांचे चिरंजीव डॉ. अश्विन वळसंगकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सदर बझार पोलीस ठाण्यात मनीषा माने-मुसळे हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल होऊन तिला अटक करण्यात आली होती.
ती गेले ६६ दिवस तुरुंगात होती. दरम्यान, पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपी विरुद्ध न्यायालयात काही दिवसांपूर्वी दोषारोपपत्र दाखल केले. त्या पार्श्वभूमीवर आरोपी माने-मुसळे हिने ॲड. प्रशांत नवगिरे यांच्या मार्फत न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. त्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांच्यासमोर झाली. आरोपीने डॉ. वळसंगकर यांच्यावर कोणतेही घाणेरडे आरोप केले नव्हते. केवळ दाद मागितली होती. यात डॉ. वळसंगकर यांनी आत्महत्या करावी, अशी परिस्थिती नव्हती. यात अन्य कोणाला तरी वाचविण्यासाठी आरोपीला बळीचा बकरा बनविण्यात आला आहे, असा युक्तिवाद ॲड. नवगिरे यांनी केला. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनी बाजू मांडली.