अहिल्यानगर: जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने भूवैज्ञानिकांच्या मदतीने जिल्ह्यातील गावोगावच्या पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीची मोहीम हाती घेतली होती. त्यामध्ये जुलै महिन्यात २७ गावांतील ३३ पिण्याच्या पाण्याचे नमुने दूषित आढळले आहेत. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील डेंग्यू आजाराच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत ४७ डेंग्यू रुग्ण आढळले.

आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात गेल्यावर्षी जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यात नगर शहरासह जिल्ह्यात १६७ डेंग्यू रुग्ण आढळले होते. यंदा मात्र ही संख्या ४७ वर खाली आली आहे. जिल्हा परिषद व महापालिकेच्या आरोग्य विभागाने सुरू केलेल्या जनजागृती मोहिमेमुळे डेंग्यू आजारास आळा बसला आहे. यंदा जानेवारी ते ऑगस्टपर्यंत १८१ संशयित रुग्णांच्या रक्त नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एकूण ८४ डेंग्यू रुग्ण आढळले. त्यामध्ये जानेवारी १, फेब्रुवारीत ०, मार्चमध्ये ११, एप्रिल १५, मे ११, जून ९, जुलैमध्ये ३० तर ऑगस्टमध्ये १७ रुग्ण आढळले. नगर शहराच्या महापालिकेच्या हद्दीत ७ तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ८७ रुग्ण आढळले आहेत.

आरोग्य विभागाने पाणीसाठ्यांची तपासणी करून लोकांना त्याबाबत जनजागृती करण्याची मोहीम सुरू केली आहे. कोरडा दिवस पाळणे, ॲबेट पावडरचा वापर करणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना यामुळे रुग्णसंखेत घट झाली आहे. महापालिकेनेही गेल्या दहा आठवड्यांपासून दर शनिवारी व रविवारी डेंग्यूमुक्त अभियान सुरू केले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे हे स्वतः सहभागी होतात. जिल्ह्यात आतापर्यंत चिकुनगुनियाचे ४ रुग्ण आढळले. गेल्या वर्षी ही संख्या ४५ होती.

जिल्हा परिषद आरोग्य विभाग व भूवैज्ञानिक यांनी पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणी मोहीम घेतली. त्यामध्ये जुलैमध्ये २१७९ पाणी नमुने तपासण्यात आले. त्यामध्ये ३३ नमुने दूषित आढळले आहेत तर १ एप्रिलपासून आतापर्यंत ९५२८ पाणी नमुने तपासले, त्यात २९९ नमुने दूषित आढळले. जुलै महिन्यात २७ गावांतील ३३ पाणी नमुने दूषित आढळले. पाणी नमुने दूषित आढळले तेथे आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्यामध्ये पाण्याचे स्रोत शुद्धीकरण करण्यासाठी ग्रामपंचायतींचे प्रबोधन, गुणवत्तापूर्ण ब्लिचिंग पावडरचा वापर, स्वच्छता मोहीम, सांडपाणी व कचरा व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या नियमित स्वच्छ करणे, जलवाहिन्यांची गळती रोखणे अशा उपायोजना करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितले.

२७ गावे

पिण्याच्या पाण्याचे नमुने दूषित आढळलेली २७ गावे: अकोले- राजूर, खिरविरे, निरगुडवाडी, कोहंडी, भोजदरवाडी, उंचखडक बुद्रूक, पारनेर- चास, वनकुटे, भाळवणी, कातळवेढे, मांडवे खुर्द, पाथर्डी- कासार पिंपळगाव, निपाणी व जळगाव. अहिल्यानगर- वडगाव, राळेगण, कौडगाव, संगमनेर- सायखिंडी, चंदनापुरी, हिवरगाव, पाथरे, जांबुत खुर्द, गाभणवाडी, राहाता- रांजणगाव खुर्द, राहुरी- माहेगाव, शेवगाव- विजयपूर, श्रीगोंदे- आनंदवाडी, श्रीरामपूर- निपाणी वडगाव, माळवडगाव.

आमदारांच्या गावात पिण्याचे पाणी दूषित

पाथर्डीतील कासार पिंपळगाव हे भाजप आमदार मोनिका राजळे यांचे निवासस्थान असलेले गाव. या गावातील पिण्याच्या पाण्याचा नमुना दूषित आढळला आहे.