सोलापूर शहर व जिल्ह्य़ाच्या बहुतांश भागात मागील तीन-चार दिवसांपासून रविवारी पुनवर्सु नक्षत्राच्या पावसाची हजेरी लागत आहे. ग्रामीण भागात हा पाऊस खरीप पेरण्यांसाठी पोषक ठरल्यामुळे शेतकरीवर्गात समाधान व्यक्त होत आहे. रखडलेल्या खरीप पिकांच्या पेरण्या शेतक-यांनी सुरू केल्याचे दिसून येते.
जिल्ह्य़ात यंदा मृग व आद्रा ही दोन्ही नक्षत्रे जवळपास कोरडी गेली असून त्यामुळे खरीप हंगामही अक्षरश: वाया गेल्यात जमा आहे. सद्यस्थितीत खरिपाच्या जेमतेम एक-दोन टक्केच पेरण्या झाल्या आहेत. पावसाने दगा दिल्यामुळे पिकांच्या पेरण्यांबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची चिन्हे दिसत आहेत. पावसाअभावी जिल्ह्य़ात सध्या सुमारे २०२ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असताना पुनवर्सु नक्षत्राकडे सर्वाचे डोळे लागले आहेत. अखेर या नक्षत्राच्या पावसाने गेल्या तीन-चार दिवसांपासून सतत हजेरी लावून दिलासा दिला आहे.
मंगळवारी दुपारनंतर आकाशात ढगांची गर्दी होऊन पावसाच्या आगमनाची चाहूल लागली व त्यापाठोपाठ पावसाला प्रारंभ झाला. सुमारे पाऊण तास पाऊस पडत होता. शहरात पावसामुळे रस्ते जलमय झाले होते. तर ग्रामीण भागात उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ, माढा, करमाळा आदी भागात पावसाने हजेरी लावल्याचे सांगण्यात आले. शेतक-यांनी आकाशाकडे डोळे लावून शेतात खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्यांसाठी जमिनीची मशागत करून ठेवली होती. सुदैवाने पाऊस सुरू झाल्याने शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतामध्ये वाफसा तयार होऊन खरीप पिकांच्या पेरण्यांना सुरुवात झाल्याचे सांगण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 16th Jul 2014 रोजी प्रकाशित
सोलापूर परिसरात पावसाची रिमझिम; शेतकरी सुखावले
सोलापूर शहर व जिल्ह्य़ाच्या बहुतांश भागात मागील तीन-चार दिवसांपासून रविवारी पुनवर्सु नक्षत्राच्या पावसाची हजेरी लागत आहे. ग्रामीण भागात हा पाऊस खरीप पेरण्यांसाठी पोषक ठरल्यामुळे शेतकरीवर्गात समाधान व्यक्त होत आहे.

First published on: 16-07-2014 at 03:48 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drizzle rain in solapur area enthusiasm in farmers