Matoshree Drone वांद्रे येथील मातोश्री परिसरात ड्रोन उडवला गेल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात होऊ लागली. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी संताप व्यक्त केला आहे. मातोश्रीवर ड्रोन नेमका कोणत्या हेतूसाठी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
काय म्हटलं आहे अनिल परब यांनी?
शिवसेना पक्षप्रमुख यांच्या निवासस्थान ‘मातोश्री’च्या बाहेर एक ड्रोन घिरट्या घालताना दिसला – पण प्रश्न असा आहे की हा ड्रोन नेमका कोणाचा आणि कोणत्या हेतूसाठी होता? या ड्रोनद्वारे चित्रीकरण का करण्यात आले? यामागे कोणतेही अतिरेकी पार्श्वभूमी कारण तर नाही ना? मातोश्रीसारख्या Z+ सुरक्षा असलेल्या संवेदनशील क्षेत्रात न कळवता ड्रोनद्वारे शूटिंग करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या घटनेमागे कोणते षडयंत्र लपलेले आहे का, याचा शोध घेणे आवश्यक आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर असून, प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. प्रशासनाने सखोल चौकशी करून या ड्रोनमागील उद्देश, जबाबदार व्यक्ती आणि त्यामागील पार्श्वभूमी स्पष्ट करावी जेणेकरून शिवसैनिक आणि नागरिकांच्या मनातील संभ्रम दूर होईल.
उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर
उद्धव ठाकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत मातोश्रीवर नजर ठेवली जात आहे का? असा प्रश्न आता यानंतर उपस्थित झाला आहे. यावरुन आता राजकीय वाद पेटला आहे. ठाकरे गटाकडून भाजप ड्रोनच्या माध्यमातून मातोश्रीची टेहळणी केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून हा आरोप फेटाळण्यात आला आहे.
सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या?
सगळ्या प्रकारानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री राहिलेल्या आणि एका पक्षाचा प्रमुख असलेल्या नेत्याच्या घराबाहेर अशाप्रकारे टेहळणी केली जात असेल, तर हा प्रकार गंभीर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतक्या लिंबूटिंबू लोकांना सुरक्षा देऊन ठेवली आहे. परंतु, मातोश्रीबाहेरील सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. भाजपला लोकांच्या किचनमध्ये डोकावण्याचा छंद आहे. मतचोरी उघड झाल्यानंतर भाजप धास्तावली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर भेटायला कोण येते, यावर नजर ठेवली जात आहे. असं काही घडलं नसेल तर हा ड्रोन कोणी सोडला होता, मातोश्रीच्या सुरक्षेत हयगय कशी होऊ शकते, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.
मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण काय?
मातोश्री परिसरात ड्रोन फिरताना आढळले होते त्यावर आता मुंबई पोलिसानी स्पष्टीकरण दिलेले आहे. एमएमआरडीएने परवानगी घेऊनच बिकेसी आणि खेरवाडी परिसरात ड्रोन उडवले आहेत.
