चिपळूण – खेर्डी एमआयडीसी  रस्त्यावर अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका संशयीताला रत्नागिरीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून पाच लाख वीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे रत्नागिरीनंतर आता चिपळूणमध्ये अमली पदार्थ विरोधी पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.

चिपळूण मध्ये मागील वर्षभरातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. यापूर्वी स्थानिक पोलिसांनी किरकोळ कारवाई केल्या आहेत.  रत्नागिरीत मागील काही दिवसांपासून पोलिसांची अमली पदार्थ विरोधी धडक कारवाई सुरू आहे. रत्नागिरीमध्ये कारवाई सुरू असतानाच आता चिपळूणमध्ये ही पोलिसांनी मोर्चा वळविला आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक नितीन ढेरे हे आपल्या कर्मचाऱ्यांसह चिपळूणमध्ये गस्त घालत होते. चिपळूण शहरापासून जवळ असलेल्या खेर्डी एमआयडीसीतील रस्त्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची मोहीम सुरू असताना तेथे दीपक रंगला लीलारे (वय. २४ ) रा. कावीळतली चिपळूण हा तरुण आपल्या दुचाकीवरून एका कपडी पिशवीतून काहीतरी घेऊन जात असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना संशय आला. पोलिसांनी लीलारे याला थांबवले आणि चौकशी केली असता त्याने प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याची पिशवी तपासल्यानंतर त्यात एमडी हे नऊ ग्रॅम अमली पदार्थ आढळून आले. बाजारात त्याची किंमत पाच लाख वीस हजार रुपये इतकी आहे. पोलिसांनी त्याला मुद्देमालासह ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  हे अमली पदार्थ नेमके आले कुठून ? कोणाला विकले जाणार होते आणि यामध्ये अन्य कोण कोणाचा सहभाग आहे? याचा शोध आता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना घ्यावा लागणार आहे.