राहाता : शिर्डी येथून जवळच असलेल्या निघोज गावच्या हद्दीत मद्यधुंद १० ते १२ जणांच्या टोळक्याने एका हॉटेलमध्ये प्रवेश करून पैशांची मागणी करत मालकावर जिवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री घडली. या घटनेत हॉटेलचा मालक गंभीर जखमी झाला आहे. याबबत शिर्डी पोलिसांनी ४ तरुणांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.

विजय बापू कापसे (वय २९, बाजारतळ, शिर्डी), किरण अशोक बागुल (वय २३, निघोज ता. राहता), बंटी उर्फ सोमनाथ अनिल घाणे (वय १९, सौदडीबाबा चौक, शिर्डी), शेखर साहेबराव कापसे (वय २०, कालिका पार्क, शिर्डी) असे अटक केलेल्या चार जणांची नावे आहेत.

तालुक्यातील सावळीविहीर येथील कार्यकर्ते दिलीप बाठिया यांचे निघोज येथे हॉटेल आहे. दिलीप बाठीया यांचा मुलगा वैभव हा या हॉटेलचे व्यवस्थापन सांभाळतो. बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे साईभक्त हॉटेलमध्ये जेवण करत असताना १० ते १२ तरुणांनी हॉटेलचे वैभव बाठिया यांना आम्हाला दरमहा हॉटेलचा १० हजार रुपये महिना दे, असे म्हणाले असता त्यास बाठिया यांनी नकार दिल्याने त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये वैभव हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी साई संस्थानच्या सुपर स्पेेशालटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तोपर्यंत हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले. या हल्ल्यात हॉटेलचे अतोनात नुकसान झाले असून टेबल, खुर्च्या, खिडक्या, लॅपटॉप, किचनमधील सामानाची तोडफोड करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून रात्रीच फरार झालेल्या आरोपींच्या तपासासाठी पथके रवाना करून आज गुरुवारी चार जणांना अटक केली. वैभव बाठिया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मागील आठवड्यात या हॉटेलचे उद्घाटन केले होते. शिर्डीतील गुंडांच्या टोळ्यांनी पुन्हा डोके वर काढल्याचे या घटनेवरून पुन्हा सिद्ध झाले आहे.

गुन्हेगारीत वाढ

फेब्रुवारी महिन्यामध्ये शिर्डीत दुहेरी हत्याकांड झाल्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे व डॉ सुजय विखे यांनी जातीने लक्ष घालून शिर्डीतली गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी पोलिसांना सूचना दिल्या होत्या. परंतु, शिर्डी शहरातील गुन्हेगारी कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत असल्याचे वेगवेगळ्या घटनांवरून दिसून येत आहे.