पंढरपूर : येथील वारीच्या काळात जरी या पूर्वी महाआरोग्य शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला असला. तरी शिबिराच्या ठिकाणी गर्दी होऊन अडचणी निर्माण होत असल्याने यंदा एकाच ठिकाणी महाआरोग्य शिबिराऐवजी जागोजागी छोट्या शिबिरांचे आयोजन केले जाणार असल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. यंदा अशाप्रकारे छोटी शिबिरे घेतली जातील. ४६ ठिकाणी १० खाटांचे तात्पुरते अतिदक्षता विभाग, पालखी मार्गावर २९० बाईक आरोग्यदूत आरोग्य सेवा देणार असल्याची माहितीही आबिटकर यांनी दिली.
आबिटकर यांनी आषाढी यात्रेच्या आरोग्य विभागाच्या कामाचा आढावा घेतला. येथील वाखरी पालखी तळ येथे जाऊन पाहणी केली. या वेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते. या आधी आषाढी यात्रा काळात तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पुढाकार घेवून महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. त्याला भरभरून प्रसिद्धी मिळाली होती. वारीत येणाऱ्या भाविकांना लाभ झाल्याचा दावा त्यावेळेस करण्यात आला. यंदा वारीची तयारी सुरू झाल्यापासून आरोग्य शिबिर होणार का ? याकडे लक्ष होते. आरोग्यमंत्री यांना याबाबत विचारले असता त्यांनी शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, काही अधिकाऱ्यांनी या शिबिराबाबत नागरिकांना आलेल्या अडचणी सांगितल्या. असे असले तरी वारीला येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व सुविधा देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच राज्यातील वाढत्या करोनाबाबत आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिली. राज्यात करोनाचे रुग्ण वाढत असले तरी बरे होत आहे. गरजेपेक्षा जास्त काळजी करणे गरजेचे नाही, असे आबिटकर म्हणाले.
त्यानंतर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला आमदार समाधान आवताडे, आमदार राजू खरे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपस्थित होते. यावेळी त्यांनी भाविकांना आरोग्याच्या दृष्टीने सर्व सुविधा द्याव्यात. साथीचे रोग पसरणार नाही, यासाठी पालखी मार्गावर स्वच्छता, फवारणी, आरोग्य सेवा द्याव्यात. पालखी मार्गावर वैद्यकीय पथके, आवश्यक ते उपकरणे औषधांसह सुसज्य ३३१ रुग्णवाहिका तैनात करण्यात येणार आहेत. भाविकांना आरोग्य सेवा देणे, सर्वांनी सेवाभावी वृत्तीने सेवा बजावावी, असे आवाहन आबिटकर यांनी केले. दरम्यान, आरोग्यमंत्र्यांनी मंदिरात दर्शनाला जाताना पालकमंत्र्यांच्या आवाहनला प्रतिसाद देत पायी मंदिरात जाऊन दर्शन घेतले.