प्रशांत देशमुख

करोनाच्या संकटसमयी सध्या अनेकांचे ठरलेले विवाह मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत आणि सुरक्षिततेची काळजी घेऊन पार पडत आहेत. त्यातच एका पत्रकाराचाही विवाह आज पार पडला. सध्याच्या करोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक स्वरुपाच्या व्यवसायात असल्यानं लग्नासाठी सुट्टी न घेता या पत्रकारानं ‘वर्क फ्रॉम होम’ सुरु असतानाच आज ‘मॅरेज अॅट होम’ करीत आपल्या नव्या आयुष्याला प्रारंभ केला. एका नामांकित वृत्तवाहिनीसाठी काम करणाऱ्या या पत्रकारानं आपल्या कृतीतून आदर्श निर्माण केला आहे.

पत्रकार पराग ढोबळे यांचा विवाह पूर्वीच निश्चित झाला होता. लग्नाची तारिख जवळ येत असल्यानं लॉकडाउन दुसऱ्या टप्प्यानंतर निवळला तर उत्तमच असा त्यांनी विचार केला. मात्र, त्यात तिसऱ्यांदा वाढ झाल्यानंतर त्याचं कुठलंही शल्य न बाळगता गायत्री आणि पराग या वधू-वरांनी लग्न पुढं न ढकलता ठरलेल्या दिवशी म्हणजेच ५ मे रोजी करण्याचं निश्चित केलं.

आणखी वाचा- शासकीय योजनांचे पैसे घेऊन पोस्टमन आपल्या दारी

सध्याच्या नियमानुसार लग्नासाठी केवळ १० वऱ्हाडी घेऊन पराग दुसऱ्या गावातील गायत्रीच्या घरी पोहचला. इथं मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत मंगलाष्टके, सप्तपदी व अन्य लग्न विधी पार पडले. त्यानंतर हातात सॅनिटायझर, डोक्याला मुंडावळ्या, तोंडाला मास्क आणि करोनामुळं झालेल्या आपल्या या अवस्थेचं हसू, अशी या नवदाम्पत्याची छबी कॅमेरात उमटली. हा क्षण एक हळवा कोपरा होता. या लग्नाला मुलीचे मामा, बहीण, मेव्हणे त्यांची मुलं येऊ शकली नाहीत. मुलाचे काकाही येऊ शकले नाहीत. दरम्यान, परिस्थितीचं भान ठेवून ‘मॅरेज अॅट होम’ केलं ते उत्तमच! तुझे कौतुक आणि अभिनंदन अशा शब्दांत या परागच्या वरिष्ठांनी त्याला शुभेच्छाही दिल्या.

करोनाच्या लढ्यातील शिपाई असल्याचं तो विसरला नाही 

पत्रकाराचा मित्र-गोतावळा त्याच्या धूम धडाक्यातील विवाहाच्या प्रतिक्षेत होता. पण बदललेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर परागने घेतलेला स्तुत्य निर्णय सर्वांसाठी आदर्श ठरला. तशी भावनाही सर्वांनी फोनद्वारे व्यक्त केली. लग्न पार पडल्यानंतर दोन घास गोडधोड घेऊन नवरदेवाचा पेहराव उतरवून पराग लगेचच कॅमेरा घेऊन कामालाही लागला. कारण करोनाच्या लढ्यातील तो ही एक शिपाई असल्याचं विस्मरण त्याला झालं नव्हतं.