मुंबईला रायगडशी जोडणाऱ्या शिवडी न्हावा शेवा अटल सेतू सागरी सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. देशातील सर्वांत मोठा सागरी सेतू म्हणून प्रचिती असलेल्या या सेतूबद्दल नरेंद्र मोदी यांनी गौरवोद्गार काढले. तसंच, अटल सेतूबाबत बोलताना त्यांनी काँग्रेसच्या काळात बांधलेल्या वांद्रे-वरळी सीलिंकशी याची तुलना केली. तसंच, काँग्रेसवरही टीकास्र डागलं.

“आज जगातील सर्वांत मोठा विशाल अटल सेतू देशाला मिळाला. हे आमच्या संकल्पातील प्रमाण आहे. भारताच्या विकासासाठी आम्ही सागराशीही मुकाबला करू शकतो. लाटांविरोधात लढू शकतो. आजचा कार्यक्रम संकल्पातून सिद्धीचे परिमाण आहे. २४ डिसेंबर २०१६ चा दिवस विसरू शकत नाही. या दिवशी अटल सेतूच्या भूमिपूजनासाठी आलो होतो. तेव्हा मी छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून म्हटलं होतं की लिहून ठेवा, देश बदलेलही आणि देश पुढेही जाईल”, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

हेही वाचा >> “मोदी आमच्यामागे पहाडासारखे उभे आहेत, म्हणूनच आम्ही…”, अटल सेतूच्या उद्घाटनानंतर फडणवीसांकडून कौतुकोद्गार

“ज्या व्यवस्थेत वर्षानुवर्षे कामं थांबवून ठेवण्याची सवय लागली होती, त्यामुळे देशवासियांना काहीच आशा राहिल्या नव्हत्या. लोकांना वाटत होतं, त्यांच्या हयायतीत मोठे प्रकल्प पूर्ण होतील की नाही याची शाश्वती नव्हती. त्यामुळे मी म्हटलं होतं की लिहून ठेवा, देश बदलेल आणि नक्कीच बदलेल. ही तेव्हा मोदींची गॅरंटी होती. आज मी छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा नमन करताना, मुंब्रा देवी, सिद्धीविनायकाला प्रणाम करून अटल सेतू मुंबईकरांसाठी समर्पित करत आहे. करोनाच्या महासंकटातही मुंबई ट्रान्स हार्बरचं काम पूर्ण होणं ही मोठी गोष्ट आहे. भूमिपूजन, लोकार्पण एका दिवसाच्या कार्यक्रमापुरतं नसतं. आमच्यासाठी प्रत्येक प्रकल्प भारताच्या नवनिर्माणाचं माध्यम आहे. एका-एका विटातून इमारत बनते. तसंच अशा प्रत्येक प्रकल्पातून भव्य भारताची इमारत बनेल”, असंही मोदी म्हणाले.

६ स्टॅच्यु ऑफ लिबर्टी तयार होतील एवढ्या बांधकाम साहित्याचा वापर

“गेल्या काही दिवसांपासून मुंबई ट्रान्सहार्बर लिंकची चर्चा आहे. अटल सेतूचे फोटो पाहून प्रत्येकाला अभिमान वाटतो. हे फोटो मंत्रमुग्ध करणारे आहेत. या सेतूच्या बांधकामासाठी जेवढ्या वायर्स आहेत, त्यात पृथ्वीला दोनवेळा प्रदक्षिणा घालून होतील. ४ हावडा ब्रिज, ६ स्टॅच्यू ऑफ लिबर्टी तयार होऊ शकेल, एवढं बांधकाम साहित्य या सेतूसाठी वापरण्यात आलं आहे”, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

“या सागरी सेतूमुळे मुंबई आणि रायगडचं अंतर कमी झालं आहे. तसंच, नवी मुंबईसह पुणे आणि गोवा जवळ येणार आहे. हा सेतू पूर्ण होण्याकरता जपानने मदत केल्याने त्यांचे मी आभार मानतो. आज प्रिय मित्र स्वर्गीय आबे यांची मला आठवण आली. कारण या ब्रिजचे काम पूर्ण करण्याचा संकल्प आम्ही दोघांनी मिळून केला होता. अटल सेतू भारताच्या त्या आकांक्षाचा जयघोष आहे, जो २०१४ मध्ये पूर्ण देशाने केला होता”, असं मोदी म्हणाले.

हेही वाचा >> “अटल सेतू विरोधकांचा अहंकार मोडणारा ठरणार, कारण…”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य चर्चेत

अटल सेतू म्हणजे विकसित भारताची झलक

“२०१४ मध्ये माझ्यावर निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली होती. त्याआधी मी रायगड किल्ल्यावर गेलो होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ मी काही क्षण बसलो होतो. या गोष्टीला १० वर्षे झाली. या १० वर्षात आपल्या स्वप्नांना सत्य होताना पाहिलंय. अटल सेतू या भावनेचा प्रतिबिंब आहे. तरुणांना नव्या विश्वास घेऊन आले आहेत. त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा रस्ता अटल सेतूसारख्या रस्त्यांवरून जातो. अटल सेतूच्या विकसित भारताचा फोटो आहे. विकसित भारताचा झलक आहे. विकसित भारतात गती, प्रगती होईल. विकसित भारतात अतंर कमी होईल, देशाचा कानाकोपरा जोडला जाईल. निरंतर आणि अडथळ्यांविना सर्व सुरूळीत राहिल”, असं मोदी म्हणाले.

आता प्रकल्पांची चर्चा होते

ठगेल्या १० वर्षांत भारत बदलला आहे. याची चर्चा खूप होते. बदलत्या भारताचा फोटो स्वच्छ होतो जेव्हा १० वर्षांच्या आधीचा भारत आठवतो. हजारो लाखो रुपयांच्या महाघोटाळ्यांची चर्चा असायची. आता हजारो कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प पूर्ण झाल्याच्या चर्चा असतात. सुशासनाचा हा संकल्प देशभर दिसत आहे. अटल टनल आणि चेनाब सारख्या ब्रिजची चर्चा होते. एकामागोएक बनवणाऱ्या महामार्गांची चर्चा होते. इस्टर्न आणि वेस्टर्न, वेस्ट कॉरिडोर रेल्वेचे प्रतिमा बदलणारे आहे. वंदे भारत, नमो भारत, अमृत भारताचे ट्रेन सामान्य माणसांचं जीवन सुकर करत आहेत. आज प्रत्येक देशातील प्रत्येक कोनात नव्या एअरपोर्टचे उद्घाटन होत आहे. महाराष्ट्रातही अनेक मेगा प्रकल्प पूर्ण होत आहेत”, असंही मोदी म्हणाले.

“गेल्यावर्षी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाले. नवी मुंबई विमानतळ आणि कोस्टल रोडचे काम प्रगतीपथावर आहे. येणाऱ्या वर्षात मुंबईला पहिली बुलेट ट्रेनही मिळेल. करदात्यांचा पैसा विकासासाठी वापरला जात आहे. परंतु, देशावर दशकाहून अधिक काळ शासन करणाऱ्यांनी देशाचा पैसा आणि करदात्यांच्या पैशांचा विचार केला नाही. त्यांचे प्रकल्प पूर्ण व्हायचे नाहीत किंवा उशिराने पूर्ण व्हायचे”, अशी टीकाही मोदींनी केली.

आज अटल सेतू आपल्याला मिळाला आहे, त्याचं प्लानिंग फार पूर्वीपासून सुरू होतं. पण ते पूर्ण करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. वांद्रे वरळी सीलिंक हा अटल सेतूहून पाचपट लहान आहे. या सीलिंकसाठी दहा वर्षे लागले होता. बजेट ४-५ टक्के अधिक वाढले होते. पण, अटल सेतूमध्ये सुविधाहीच नाही इतर गोष्टींचंही साधन आहे. या निर्माणासाठी १७ हजार कामगार, १५०० अभियांत्रिकांना थेट रोजगार मिळाला, अशी अधिकाविध माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.