कराड : पाटण तालुक्यात महसूल विभागाकडून आजपर्यंत शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत कशा पोहोचतील. विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले वितरित करताना त्यांचे नुकसान होणार नाही, याकडे गांभीर्याने पाहिले गेले असून, अनेक दाखले रात्री उशिरापर्यंत वितरित केलेले आहेत. मात्र, काहीजण जाणीवपूर्वक महसूल यंत्रणेला वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत असल्याची खंत पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे यांनी पाटण येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली. तहसीलदार अनंत गुरव यांचीही या वेळी उपस्थिती होती.

प्रांताधिकारी सोपान टोम्पे म्हणाले की, पाटण तालुक्यात तीन हजार १२७ लाभार्थ्यांना आजपर्यंत भूकंपग्रस्त म्हणून दाखले वाटप झाले आहेत. राज्य शासनाच्या निर्णयानुसार हे दाखले देण्यात आले आहेत. या शासन निर्णयात भूकंपग्रस्त कुटुंबामध्ये पती, पत्नी, मुलगा, अविवाहित मुलगी व कुटुंब प्रमुखावर अवलंबून असणारे भाऊ, बहीण, नातू आणि सून यांचा समावेश दाखल्यासाठी पात्र लाभार्थी म्हणून केला गेला आहे. मात्र, काहीजण इतर नातेवाइकांसाठी हा दाखला मागणी करत आहेत. ही मागणी शासन निर्णयात बसत नसतानाही आणि तसे संबंधितांना कळविले असतानाही महसूल प्रशासनाला वेठीस धरून हे लोक समाज माध्यमावर जनतेची दिशाभूल करत आहेत. आणि सर्व अव्यवहार्य असून, पूर्णतः गैर व चुकीचे असल्याचे प्रांताधिकारी टोम्पे यांनी ठामपणे सांगितले.

पाटण तालुक्यात राज्य शासनाच्या निर्णयातील निकष आणि अटींची पुर्तता करून भूकंपग्रस्त दाखला मागणाऱ्यांस दाखले दिले गेले आहेत. काहीवेळा दाखले मागणाऱ्या संबंधितांच्या घरी जाऊन दाखले वाटप करण्यात आलेले आहेत. मात्र, काहीजण चुलते, चुलत आजोबा, चुलत पणजोबांच्या भूकंपग्रस्त साहित्य वाटपाच्या दप्तरातील नोंदीच्या आधारे भूकंपग्रस्त म्हणून दाखला मागत आहेत. या शासन निर्णयात भावाच्या मुलाला अथवा नातवाला दाखला देण्यासंदर्भात कोणतेही निर्देश देण्यात आलेले नसल्याने भूकंपग्रस्त दाखला देता येणार नाही असे आम्ही लेखी कळविलेलेसुद्धा आहे. तसेच याबाबत सातारा जिल्हाधिकाऱ्यांना ७ जानेवारी २०२५ रोजी व जिल्हाधिकारी सातारा यांनी शासनाच्या अवर सचिवांना २० मे २०२५ रोजी मार्गदर्शन मागविले आहे. मात्र, शासनाकडून हे मार्गदर्शन मिळालेले नाही. तरीही काही जण दाखल्यासाठी महसूल यंत्रणेला वेठीस धरत आमच्या प्रशासनाचे मानसिक संतुलन बिघडवत आहेत. त्याचा एकूण कामकाजावर परिणाम होत आहे. याबाबतीत संबंधितांनी थेट वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करणे गरजेचे आहे असे मत सोपान टोम्पे यांनी या वेळी व्यक्त केले आहे.

कुणबी जातीचे व उत्पन्नासह विविध दाखले त्याचबरोबर भूकंपाचे दाखले हे लाभार्थ्यांना वेळेत दिल्याने अनेक जण विविध क्षेत्रांत निघालेल्या भरती प्रक्रियेत यशस्वी झाल्याचेही प्रांताधिकारी सोपान टोम्पे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.